विकी कौशल आणि यामी गौतम स्टारर ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट मागील शुक्रवारी प्रदर्शित झाला. ‘ये हिंदुस्तान चुप नहीं बैठेगा, ये नया हिंदुस्तान है. ये घर मै घुसेगा भी और मारेगा भी’, असं म्हणत या चित्रपटामध्ये भारताच्या सूडाची कहाणी सांगण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८.२० कोटींचा गल्ला जमवला होता. त्यानंतर केवळ दोन दिवसामध्ये या चित्रपटाने २० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी या चित्रपटाने ८.२० कोटी कमावले. तर दुसऱ्या दिवशी १२.४३ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. विशेष म्हणजे या कमाईमध्ये तिसऱ्या दिवशी वाढ होत हा आकडा १४ कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीत या चित्रपटाने ३४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

या चित्रपटाचं २५ कोटी रुपयांचं बजेट होत. मात्र कमाईचा आकडा बघता या बजेटच्या रकमेची वसुली कधीच पूर्ण झाली आहे. येत्या दिवसांत कमाईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीरच्या ‘उरी’मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी लष्कराच्या तळावर भ्याड हल्ला केला होता. या हल्ल्यात १९ भारतीय जवानांना वीरमरण आले होते. भारताने या हल्ल्याचे चोख उत्तर सर्जिकल स्ट्राइकने देत पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित ‘उरी’ हा चित्रपट आहे.