अभिनेत्री उर्मिला कोठारेनं फेसबुकवर नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. मात्र याच व्हिडीओमुळे उर्मिला सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता इतरांसाठी दिवसरात्र मेहनत करणाऱ्या पोलिसांसाठी उर्मिलाने हा व्हिडीओ केला आहे. मात्र त्यात रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलिसांनी दिलेला चोप पाहून खूप बरं वाटलं, असं म्हटल्याने उर्मिला ट्रोलिंगची शिकार झाली आहे.

“व्हॉट्स अॅपवर अनेक व्हिडीओ फॉरवर्ड केले जातात. त्यात रस्त्यावर फिरणाऱ्यांना पोलीस चांगलाच चोप देतानाचे काही व्हिडीओ पाहिले. हे व्हिडीओ पाहिल्यावर मला खूप बरं वाटलं. या पोलिसांना माझा सलाम आणि त्यांच्यासाठी मी हे नृत्य समर्पित करत आहे”, असं उर्मिला या व्हिडीओच्या सुरुवातीला म्हणते. त्यानंतर तिच्या नृत्याची झलक व्हिडीओत पुढे पाहायला मिळते.

आणखी वाचा : ..अन् ‘तारक मेहता..’च्या सेटवरच जेठालाल व बबितामध्ये झाला वाद 

“लोक भुकेने मरत आहेत. लोकं बाहेर कशाला पडत आहेत हे आधी जाणून घ्या”, असं नेटकऱ्यांनी उर्मिला या व्हिडीओच्या कमेंटमध्ये म्हटलंय. तर गरजू लोकांप्रती असलेली ही अत्यंत असंवेदनशील भावना आहे, असं म्हणत दुसऱ्या नेटकऱ्याने टीका केली.