देशात गेल्या वर्षी करोनाचा शिरकाव झाल्यापासूनच योगगुरू बाबा रामदेव यांनी निरोगी राहण्यासाठी देशवासियांना अनेक उपदेश दिले. रामदेव यांनी पतंजलिची औषधं आणि योग करून करोनावर मात करणं शक्य असल्याचा दावा अनेकदा केला आहे. मात्र त्यानंतर त्यांनी अ‍ॅलोपॅथी औषध आणि डॉक्टरांवर केलेल्या वक्तव्यानंतर मात्र देशभरातून त्यांच्यावर संताप व्यक्त केला जातोय. अनेक डॉक्टरांनी तर बाबा रामदेव यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. तर दुसरीकडे बॉलिवूड आणि राजकीय वर्तुळातील व्यक्तींकडूनही रामदेव यांंच्या या वक्तव्यावर नाराजी दर्शवली जातेय.

नुकतच अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकरने रामदेव बाबांना सोशल मीडियावरून फटकारलं आहे. उर्मिलाने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट पोस्ट केलंय. “कुणीतरी या बिझनेसमनला एखाद्या कोविड रुग्णालयात जायला सांगा. तिथे आपल्या डॉक्टर, फ्रंटलाइन वर्कर्ससोबत २४ तास उभं रहा आणि मग ही टरटर करा. हे सर्वात अमानुष, क्रोधास्पद आणि घृणास्पद आहे. हे कुणाचे टूलकिट आहेत? त्यांची एवढी हिंमत कशी झाली?” असं म्हणत उर्मिलाने रामदेव यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

उर्मिलाच्या या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी समर्थन दर्शवलं आहे. एक युजर म्हणाला, “उर्मिलाजी तुम्ही बरोबर आहात. हे बनावटी बाबा आहेत.”. उर्मिला सोबतच अभिनेत्री तापसी पन्नूने देखील एक ट्विट करत रामदेव यांच्यावर निशाणा साधला होता.

वाचा: अरुणाचल प्रदेशच्या आमदाराला ‘चायनीज’ म्हणणाऱ्या यूट्यूबरला सेलिब्रिटींनी सुनावलं!

अ‍ॅलोपॅथीसंदर्भातील त्या विधानावरुन वाद…

अ‍ॅलोपॅथीच्या विधानावरून रामदेव यांनी सोमवारी आपली चूक कबूल केली. व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केलेला मेसेज वाचून केलेले “अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान आहे” हे विधान आपण मागे घेतल्याचं रामदेव यांनी जाहीर केलं. रामदेव यांचा एक व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटलं होतं. ‘अ‍ॅलोपॅथी हे मूर्ख विज्ञान असून रेमडेसिविर, फॅव्हिफ्लू यांसह औषध महानियंत्रकांनी मान्यता दिलेली अनेक औषधं करोनावर उपचार करण्यात अपयशी ठरली आहेत,’’ असं वक्तव्य रामदेवबाबा यांनी केलं होतं. त्याला डॉक्टरांच्या ‘भारतीय वैद्यकीय संघटने’ने (आयएमए) आक्षेप घेतला आहे. त्याचबरोबर अ‍ॅलोपॅथिक औषधं घेऊन लाखो रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या रामदेवबाबांच्या विधानावरही ‘आयएमए’ने आक्षेप नोंदवला आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी रामदेवबाबांना वक्तव्य मागे घेण्यास सांगितलं होतं.