एका वर्षाहून अधिक काळ राजकारणापासून दूर राहिल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी सक्रिय राजकारणाला सुरूवात केली. शिवबंधन हाती बांधत उर्मिला यांनी पुन्हा एकदा राजकारणात पाऊल ठेवलं. त्यामुळे त्या आता पडद्यावर दिसणार की नाही, असा प्रश्नही औत्सुक्यानं विचारला जात आहे. चाहत्यांना पडलेल्या प्रश्नाला उर्मिला मातोंडकरांनी उत्तर दिलं आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी उत्तर प्रदेशात होणाऱ्या फिल्मसिटी व त्यांच्या यापुढील अभिनय प्रवासाबद्दल माहिती दिली. उर्मिला म्हणाल्या,”ही लोकशाही आहे. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. कुणीही कुठेही चित्रपट करावेत. हिंदी चित्रपटसृष्टीचा जन्म मुंबईत झाला आहे. दादासाहेब फाळके यांनी त्याचा पाया रोवला आहे. मुळात मुंबई व हिंदी चित्रपटसृष्टीचे अतूट नातं आहे. ते नातं कुणीही तोडू शकत नाही. मुलाचे आपल्या आईशी नातं असतं तसं हे नातं आहे. राजकपूर, दिलीपकुमार देव आनंद यांचा प्रवास बघा, ते त्यांची स्वप्न घेऊन आले त्यांची स्वप्न मुंबईत साकारली. त्यांना स्वातंत्र्य मिळाले. प्रचंड प्रेम प्रसिध्दी व पैसाही दिला ते काही एका दिवसात तुटणारे नातं नाही,” असं मत उर्मिला मातोंडकर यांनी व्यक्त केलं.

आणखी वाचा- बॉलिवूडमध्ये घाटी संबोधलं जाण्यापासून ते शिवसैनिक; असा आहे उर्मिला मातोंडकरांचा संघर्ष

“सिनेमात काम करणारच नाही असेही नाही, पण…”

भविष्यात चित्रपटसृष्टीत काम करणार का? या प्रश्नाला उत्तर देताना उर्मिला मातोंडकर म्हणाल्या,”बऱ्याच काळानंतर मी मार्चमध्ये एका चित्रपटाला व वेब सीरिजला होकार दिला होता, पण करोनामुळे दोन्ही प्रकल्प पुढे गेले आहेत. आता मला चित्रपटसृष्टीत काम करणे कठीण दिसते. सध्या माझा वेळ लोकांना भेटण्यातच जाणार आहे. पण मी चित्रपटसृष्टीत काम करणारच नाही, असेही म्हणणार नाही. महिलांशी निगडीत खूप प्रश्न व समस्या आहेत. महिलांची आर्थिक स्थिती व खास करून महिलांच्या आरोग्याशी निगडित विषयावर काम करण्याची इच्छा आहे,” अशी भूमिका त्यांनी मांडली.