मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही. लहानांना त्याची सवय होऊ लागलीय आणि तरुण पिढीवर तर त्याचे थेट दुष्पपरिणाम दिसायला लागले आहेत. मोबाइलचा अतिवापर एका अभिनेत्रीला चांगलंच महागात पडलं आहे. ही अभिनेत्री आहे ‘कसौटी जिंदगी की’ या प्रसिद्ध मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारणारी उर्वशी ढोलकिया. मोबाइलच्या अतिवापरामुळे टेनिस एल्बो झाल्याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने केला आहे.

‘स्पॉटबॉय इ’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उर्वशी म्हणाली, “काही दिवसांपूर्वीच मला टेनिस एल्बो झाल्याचं निदान झालं. मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे मला टेनिस एल्बो झाला आहे. कारण माझं संपूर्ण काम आजकाल मोबाइलवरच असतं. मला माझ्या शोचं संपूर्ण काम फोनवरच करावं लागतं. या शोचे सर्व एपिसोड मी स्वत: एडिट करते. त्यामुळे दिवसभर मला मोबाइल फोन पकडून काम करावं लागतं. त्याचाच हा दुष्परिणाम आहे.”

टेनिस एल्बो म्हणजे काय?

या व्याधीचे नाव टेनिस एल्बो असं असलं तरी ही व्याधी टेनिस खेळाडूंना होतो हा गैरसमज आहे. अनेकदा काही फेकण्याच्या आणि मैदानी खेळ तसेच अॅथलिटीक्स खेळाडूंना ही व्याधी होते. कोपराचा अतिवापर केल्याने ही व्याधी होते. गृहिणी तसेच जास्त वेळ व्यायामशाळेत जाणाऱ्या लोकांना ही व्याधी होते. यामुळे कोपराला प्रचंड वेदना होतात. कोपराजवळील स्नायूंची अधिक हालचाल झाल्याने ही व्याधी होते. विशेष म्हणजे कोपराजवळ ही व्याधी होत असली तरी तेथील स्नायूंमुळे मनगटांच्या हालचाली अवलंबून असतात. त्यामुळेच टेनिस एल्बोची व्याधी झालेल्यांना मनगटाजवळही वेदना होतात. मनगट उचलण्याचा प्रयत्न केल्यास कोपराजवळ प्रचंड वेदना होतात. टायपिंग करणे, एखादी गोष्ट पकडणे यांसारख्या गोष्टीही करणे अशक्य होते.