‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर आता दिग्दर्शक ओम राऊत यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेता सैफ अली खान रावणाची भूमिका साकारणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते. पण चित्रपटात कोणती अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अभिनेत्रीसाठी सध्या उर्वशी रौतेलाच्या नावाची चर्चा आहे.

उर्वशी तिच्या पहिल्या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगनिमित्त हैदराबादमध्ये आहे. त्या चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर आदिपुरुषचे निर्माते-दिग्दर्शक उर्वशीच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. आदिपुरुषमध्ये सीतेच्या भूमिकेसाठी उर्वशीकडे विचारणा करण्यात आली आहे. याच भूमिकेसाठी आधी अभिनेत्री कियारा अडवाणीची चर्चा होती. त्यामुळे आता कोणत्या अभिनेत्रीची वर्णी यात लागणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

दिग्दर्शक ओम राऊत यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाची घोषणा केली होती. या पोस्टरमध्ये श्रीरामाचे धनुष्यबाण दिसत होते. तर दुसरीकडे हनुमान आणि रावण दिसत आहेत. चित्रपटात प्रभास प्रभू श्रीराम यांच्या भूमिकेत तर सैफ रावणाची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. भूषण कुमार याची निर्मिती करत आहेत. २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.