फटकळ, रुक्ष, पटकन कोणालाही काहीही बोलणारी, मनाविरुद्ध कोणतीही गोष्ट खपवून न घेणारी अशा आगाऊ सासूच्या भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या उषा नाडकर्णी तीन वर्षांनी मराठीच्या छोटय़ा पडद्यावर परतत आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या ‘पुढचं पाऊल’ या मालिकेत सोहमच्या मावशीच्या भूमिकेतून त्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. अर्थातच ही मावशीही फटकळच आहे. पण विशेष म्हणजे ती प्रेमळही आहे. आजवर कजाग भूमिका केल्याच्या पाश्र्वभूमीवर ही ‘प्रेमळ’ भूमिका कशी काय स्वीकारली, असे उषाताईंना विचारले असता त्या म्हणाल्या, मला खरेतर भांडखोर व्यक्तिरेखा साकारण्याचा कंटाळा आला आहे. पण मी जर सोज्वळ भूमिका केल्या तर प्रेक्षकांचा त्यावर विश्वास बसणार नाही, अशी प्रांजळ कबुली त्यांनी दिली.
‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतील खाष्ट सासूच्या त्यांच्या व्यक्तिरेखेने बराच भाव खाल्ला होता. पण हिंदी मालिका लांबत जातात आणि मग व्यक्तिरेखेतील मजा निघून जाते, असे उषाताईंचे म्हणणे आहे.
मराठीमध्ये तीन वर्षे तुम्ही दिसला नाहीत, असे विचारले असता उषाताई म्हणाल्या, हिंदीच्या तुलनेत मराठी मालिका मला फारशा बघता येत नाहीत. त्यात हिंदी मालिकांमध्ये कलाकारांना खूप राबवून घेतात. त्यांना मोकळा वेळच मिळत नाही. त्यामुळे तेथील शिफ्ट सांभाळून मराठीत काम करायचे, असे दोन दगडांवर पाय ठेवणे शक्य होत नाही.
उषाताईंनी अलीकडेच अमिताभ बच्चनबरोबर ‘भूतनाथ रिटर्न्‍स’मध्ये काम केले आहे. अमिताभबरोबर काम करायला मिळणे म्हणजे जगणे सार्थकी लागणे, अशी भावना त्या व्यक्त करतात.