वडोदराच्या न्यायालयाने मंगळवारी अभिनेता शाहरूख खानला समन्स बजावले आहेत. वडोदरा रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी समन्स बजावण्यात आले. ‘रईस’ चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी शाहरूखने ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसने प्रवास मुंबई ते दिल्ली असा प्रवास केला होता. मात्र, यावेळी वडोदरा स्थानकावर शाहरूख खानला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरीचा प्रकार घडला होता. यामध्ये फरहीद खान या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. शाहरूखला याप्रकरणी सीआरपीसी २०४ अंतर्गत समन्स बजावले आहेत. २७ जुलै रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश शाहरूखला देण्यात आले.

जितेंद्र सोलंकी नावाच्या एका व्यक्तीने चेंगराचेंगरीप्रकरणी तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी शाहरूखच्या विरोधात ही तक्रार घेण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सोलंकी यांचे वकील जुनैद सैयद यांच्या मते शाहरूखने प्लॅटफॉर्मवर निष्काळजीपणा दाखवला ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानदेखील झाले.

वाचा : ‘बिग बॉस ११’मध्ये होणार ढिंच्याक पूजाची एण्ट्री?

यापूर्वी गुजरात उच्च न्यायालयाने रेल्वे पोलिसांतर्फे बजावलेला समन्स रोखला होता. सीआरपीसीअंतर्गत अशा व्यक्तीविरोधात समन्स बजावू शकता येत नाही जो घटनेप्रसंगी पोलीस ठाण्याच्या सीमेबाहेर होता, असे उच्च न्यायालयाचे म्हणणे होते. ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरूख खानने ऑगस्ट क्रांती एक्सप्रेसने प्रवास केला होता. २३ जानेवारीला ही गाडी वडोदरा स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक सहा वर रेल्वे १० मिनिटे थांबली होती. या दरम्यान शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी आतुर झालेले त्याचे चाहते एकमेकांवर पडले. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना हलका लाठीमार करावा लागला. यात एका व्यक्तीचा गुदमरून मृत्यू झाला. गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करणारे दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले होते.