अभिनेता शाहरुख खान याचा ‘रईस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. किंबहुना किंग खानच्या चित्रपटापेक्षाही त्याची एक झलक मिळविण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. पण, हीच उत्सुकता काही दिवसांपूर्वी अनेकांसाठी घातक ठरली होती. ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रेल्वेने प्रवास करणाऱ्या अभिनेता शाहरुख खानला बघण्यासाठी बडोदा स्थानकावर चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. ही गर्दी एका व्यक्तीच्या जीवावर बेतली.

फरहीद खान पठाण यांचा या घटनेदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पण, आता मात्र त्यांच्या मृत्यूविषयीची वेगवेगळी माहिती बाहेर पडत आहे. फरहीद खान त्याच्या आप्तेष्ठांसोबत त्यावेळी बडोदा स्थानकावर होता. ज्यावेळी बडोदा स्थानकावर गर्दीवर ताबा मिळवण्यासाठी पोलिसांनी लाठईमार केला त्यावेळीच गर्दीत गुदमरुन फरहीद यांचा मृत्यू झाला. सदर प्रकरणाची माहिती मिळताच शाहरुखने दिलगिरी व्यक्त केली होती. पण, यामध्ये शाहरुखचा काहीच दोष नसल्याचे मत फरहीद यांच्या कुटुंबियांनी मांडले आहे.

फरहीद खान यांची भाची पत्रकार समिना शेख त्यावेळी ‘रईस’च्या टीमसोबत त्याच रेल्वेने प्रवास करत होती. त्यामुळे या प्रसंगाविषयी उठणारे चर्चांचे वादळ पाहता समिनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्व काही स्पष्ट केले आहे. ‘शाहरुख खानच्या रेल्वे प्रवासादरम्यान घडलेल्या त्या प्रसंगाविषयी आता नकारात्मक चर्चा करुन माझे मामा काही परत येणार नाहीत. ती एक दुर्दैवी घटना होती. त्यासाठी तुम्ही शाहरुख खानला दोषी ठरवू नका’, असे ट्विट समिनाने केले आहे.

‘शाहरुखला माझा काही विरोध नाही. घडलेल्या घटनेत त्याचा काहीही दोष नाही’, अशी प्रतिक्रिया फरहीदच्या आईने दिल्याचे वृत्त द क्वींटने प्रसिद्ध केले आहे. ‘तो मला माझ्या मुलासारखाच आहे. माझ्या मुलाच्या अंत्यविधीसाठी शाहरुखने आम्हाला खूप मदत केली, त्याबद्दल मी त्याची आभारी आहे. माझ्या मुलाच्या मृत्युचा आणि ‘रईस’च्या प्रमोशनचा काहीही संबंध नाही’, असेही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीदेखील या घटनेची दखल घेतली. रेल्वे सुरक्षा दलाच्या महासंचालकांना या घटनेच्या चौकशीचे आदेश दिल्याचे सुरेश प्रभू यांनी म्हटले होते. रईस या चित्रपटानिमित्त शाहरुखने केलेला हा रेल्वेप्रवास पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला. प्रत्येक स्थानकावर शाहरुखची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांच्या गर्दीला आवरताना पोलिसांच्या नाकी नऊ आले होते.

वाचा: RAEES Movie Review: मुव्ही रिव्ह्यू- नाट्यमय ‘रईस’