व्हॅलेंटाइन डे म्हटलं की प्रत्येकाच्या मना भावनांचा काहूर माजतो, काही आठवणींना उजाळा दिला जातो, ही बाब नकारता येणार नाही. प्रेम व्यक्त करण्याचा हा खास दिवस म्हणजेच व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यात बी टाऊन कलाकारही मागे नाहीत. २०१६ मध्ये विवाहबद्ध झालेल्या बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवर या दोघांनीही त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन व्हॅलेंटाइन डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

करणनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत बिपाशाला व्हॅलेंटाइन डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने सोशल मीडियावरही अनेकजण त्यांच्या जिवाभावाच्या व्यक्तींना प्रेमाचे संदेश पाठवत या सुरेख दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. टेलिव्हिजन सेलिब्रिटीसुद्धा यात समाविष्ट आहेत.

एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या करण आणि बिपाशाने ३० एप्रिल २०१६ ला लग्नगाठ बांधली होती. अगदी खासगी पद्धतीने त्यांचा विवाह पार पडला होता. पण, त्यानंतर त्यांनी बॉलिवूड सेलिब्रिटींकरिता रिसेप्शन ठेवले होते. या दोघांवरही त्यांचे चाहते किती प्रेम करतात हे सर्वांना ठाऊकच आहे. त्यामुळे करण आणि बिपाशा दोघेही त्यांच्या चाहत्यांना निराश करत नाहीत, ते दोघेही सोशल मिडियाद्वारे विविध फोटो आणि व्हिडिओ नेहमीच पोस्ट करत असतात.