आलिया भोगासी भोग सुखासी….असं म्हणून तुझ्या जनरल नॉलेजवर बोलावं असं कधीच वाटलं नाही. करण जोहरने ‘स्टुडन्ट ऑफ द इयर’च्या प्रमोशन वेळी घेतलेली तुझी शाळा मला अजूनही आठवते. भारताचे पंतप्रधान कोण? या करणच्या प्रश्नावर तू पृथ्वीराज चव्हाण असं उत्तर दिलसं आणि तू विनोदाचा विषय बनलीस. आजही तुझा हा किस्सा ऐकवला की, लोक हसायला सुरु करतात. खरतरं तुझा हा विनोद मला मिश्किल पठडीतील वाटला होता. म्हणजे तुझ्या बचावासाठी मी जर वकील पत्र घेतलं असतं तर तुला बेअक्कल म्हणणाऱ्यांची अक्कल कमी असल्याचं सहज सिद्ध केले असतं. पण सर्व तुला बेअक्कल ठरवताना तू अक्कलबाज आणि अल्लड वाटायला लागलीस. आता तू म्हणशील सरळ सरळ मी चुकले, पितळ उघडं पडलं, मग बचावाचा मुद्दा काय? हाच तर तुझा अल्लडपणा आहे.

दिल्लीच्या राजकारणात महाराष्ट्राचा आवाज अजून दुमदुमलेला नाही. गल्लीतील राजकारणामुळे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं दिल्लीतील राजकारणात मन रमलं नाही. अन् आजपर्यंत महाराष्ट्रात पंतप्रधानपदाचा दावेदार भेटला नाही. मग तू दिलेलं ते उत्तर राज्यात नेतृत्व कमी पडतंय असा इशारा करणारं मला वाटलं. हा आपला एक विनोदच आहे. त्यात तुझ्या अल्लड मनान घेतलेलं नाव अभ्यासू होतं त्यामुळे न राहून मला तू अभ्यासू असल्यासारखं वाटायला लागलं.

तुझ्या बचावासाठी मी पकडलेला हा धागा मला बेअक्कल ठरवण्यासही कारणीभूत ठरु शकतो. पण तू  ‘डिअर जिंदगी’असल्यामुळे मी गियर का बदलू? तुझा हा किस्सा इथंच थांबला नाही. तुझ्यावर विनोदांचा पाऊस बरसत राहिला. अन् तू त्या पावसात भिजण्याचा आनंद घेत पुढे सरकत गेलीस. कधी कधी असं वाटायचं की, तुझ्यावर विनोद करुन लोकांना हसविण्याचा तू ध्यास वैगेरे मनी बाळगला आहेस की काय? माझ्या वाटण्यामध्ये किती सत्य आहे कुणास ठाऊक, पण तुझ्या या गुणाचे मी अनुकरण करायला लागलो. समोरच्याला आपल्यातून एक वेगळा आनंद मिळत असेल तर ती अभिमानाची गोष्ट वाटायला लागली. कारण त्याला आनंदीत केल्यामुळे ‘जिंदगी मला डियर’ वाटू लागली. तुझ्यावर प्रेम केल्यावर मला मिळालेलं ते एक गिफ्टच होतं. तेही थेट न भेटता मिळालेल ग्रेट असचं. प्रेम अडीच अक्षरातील मोडक्या ‘प्रे’ चा अर्थ मी प्रेरणा असा लावतो. जी मला तुझ्याकडून मिळते. आता तू माझी प्रेरणा असल्यावर मला बेअक्कल तर म्हटले जाणारच. मग माझाही विनोद होणार.

तुझ्या अभिनयावर कौतुकाचा वर्षाव होताना पाहिला. पुरस्काराने सन्मानित होतानाही पाहिले. पुरस्कार पोचपावती नसते, असे तुमच्यातील काही कलाकार मानतात. त्यावर माझाही काही आक्षेप नाही. पण तुझ्या भूमिकेला विनोदी न घेता कौतुकाचा झालेला वर्षाव तू जिंकलीस असा इशारा देणारा होता. अगदी फिल्मफेअरपेक्षाही मोठा…. आता प्रेमाचा शेवट कसा करावा असं वाटत असताना तो सिद्धार्थ आठवला. सिदार्थच अन् तुझं प्रेमप्रकरण सुरु असताना मला होकार दे असा अट्टाहास करुन मला तुमच्या प्रेमाचा विनोद करायचा नाही. म्हणूनच तर मला स्वीकार यावर मी फार जोर दिलेला नाही. हवं तर मी तशी प्रतिज्ञाही सादर करतो, आलिया एक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आहे. साऱ्या अभिनेत्रींपेक्षा ती वेगळी आहे. माझं तिझ्यावर अन् तिझे सिद्धार्थवर प्रेम आहे. ती डियर जिंदगी नाही म्हटली तरी तिच्याबद्दलचा आदर तसाच राहील. त्यामुळेच तुझ्या विनोदीबुद्धीवरील प्रेम अखेरपर्यंत जपण्याचा प्रयत्न करीन.

तुझा चाहता….