लगीन सराईच्या अगदी मोक्याला नाग्याच्या अविष्कारातून फुललेली तू कळीच. कुणाला माहित नसलेल्या गावरान पोरीला घेण्याच वेडेपण तुझ्या दादानं अर्थात नागराज मंजुळेनं केलं. एवढं धाडस करुन समाधान मिळाल नसाव म्हणून त्यानं विशेष आडनाव देऊन तुला आमच्या समोर आणलं. मग आडनावामुळे झालेला गोंधळ, तुझ्या दादावर झालेली टीका सगळं फोल ठरवत ‘सैराट’ चित्रपटानं समद्यांना याड लावलं. देशातील विविध राज्यात चित्रपट ‘हाऊसफुल्ल’ चालला. ज्याला तुझी भाषा कळत नव्हती त्यानं बी तुला पाहण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला. आता तू म्हणशील चित्रपटासाठी एवढं तिकिट व्हत का रताळ्या? तू दहावीत असलीस तरी बोलण्यात लय हुशार आहेस ते समद्यांना माहीत हाय. पण माझा मुद्दा असा हाय की, हा चित्रपट एकदा पाहून कुणाचं मन भरल नाही. अर्थात तुला पाहण्यासाठी अनेकांनी माझ्यासारखेच बऱ्याचदा चित्रपटाच्या बारीत उभे राहण्याचं कष्ट घेतले. तुझ्या पहिल्या वहिल्या चित्रपटानं अक्षरश: ‘जाळ अन् धूर संगटच’… काढला असंच म्हणाव लागेल. मराठी चित्रपटाच्या इतिहासाबद्दल बोलायचे, तर १९१२ साली ‘पुंडलिक’ या चित्रपटाने मराठी चित्रपटाला सुरुवात झाली. पण तब्बल शंभर वर्षानंतर मराठी चित्रपटसृष्टीच्या कुंडलीत १०० कोटींच्या आकड्याचा योग आला. याच श्रेय तुझ्या दाद्याला, तुला अन् तुझ्यासोबत बेफान झालेल्या परशासह त्याच्या समद्या मित्रांना…

आता मुद्दा काय हाय… की, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे. आता तू दादासोबत असल्याशिवाय कुणासोबत बोलत नाहीस हे चांगलच माहित आहे. पण हा मुद्दा त्याच्यासोबत बोलण्यासारखा नाहीच. तुझ्या दादाला काय भीत वैगेरे नाही, पण तुला दहावी नीट कारायची हाय हे बी बऱ्याचदा ऐकलं. त्यात आदीच तू १७ नंबरचा फॉर्म भरला आहेस. मग अभ्यासात खोळंबा नको. अभ्यास करता करताच वाचणं तुलाही सोप जाईल. म्हणून म्हटलं पत्र लिहिलेलच फायदेशीर ठरेल. तस ‘आय लाइक यू’ असं म्हणायला माझ्याकडे वेळ नाही. राग नको येऊ देऊ! कारण समद्यांना माझ्या लग्नाची घाई झाल्या. खरचं सांगतोय  नाहीतर तुला पिक्चरमधलं गाणं म्हणतोय असं वाटायचं. तू शेतात कशी थेट गेली होतीस तसं थेट सांगायच तर ‘विल यू मॅरी मी’… म्हणजे माझ्याशी लग्न करशील का? असं थेट विचारतो. तू समद्यांना वेड केलंस पण वेड्यांसोबत तू लग्न करणार नाहीस याची कल्पना असल्यामुळे मी ‘सैराट’ बघून बीन शहाण्यासारखा वावरतोय.

माझी आई सारखी म्हणायची जीन पॅन्टवालीच्या नादाला लागू नकोस बरं… शहरातल्या पोरी वंगाळ असत्यात बाळा. जीन्सवाल्याची अॅलर्जी असलेल्या आईच्या यादीत हल्ली तुझं पण नाव होत आर्ची. त्यामुळे तुला लिहण्यापूर्वी  आईला कॉल केला. तिला म्हटलं ‘मॉम आय अॅम इन लव’. आई म्हणाली याडं लागल्यागत नको बोलू. मराठीत सांग काय ते. मग भानात येऊन म्हटलं आई तुझ्यासाठी सून पाहिली आहे. रिंकू नाव हाय तिचं, सोलापूरकडची हाय. हे ऐकताना नेहमी तणतण करणारी आई शांत होती. मला वाटलं आता फोन ठेवून ती मुहूर्त शोधायलाच भटजीकडच जाणार. पण झालं भलतच. मी घोडीवर भसल्याच्या स्वप्नात दंग झाल्यावर आई शांत आवाजात म्हणाली, बाळा आपल्या घरात बुलेट नाही अन् ट्रॅक्टर बी नाही. ते येईल कधी तरी…. पण मला सून गावाला याड लावणारी नको, घराला याड लावणारी हवी! आईची ही रिंगटोन शांत असली तरी तुझ्यात आणि माझ्यात दुरावा आणणारी ती मोठी घंटाच होती. पण विघ्न असल्याशिवाय लग्नात मजाच नाही. हाक दिली साथ दे ‘सैराट झाल जी’….गाण्यानं या पत्राला साद दे!

तुझा ‘सैराट’ चाहता…