तौक्ते चक्रीवादळाचा फटका मुंबईतील यशवंत नाट्यमंदिराला बसला आहे. सोमवारी-मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे नाट्यगृहामध्ये ठिकठिकाणी गळती झाली आहे. तर गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतनही थकले आहे. याबाबत नियामक मंडळ सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

नाट्यगृहातील गळती थांबवण्यासाठी उपाय आणि कर्मचाऱ्यांचे थकलेले वेतन देणे अशा समस्या सध्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेसमोर उभ्या राहिल्या असून याबाबत नियामक मंडळ सदस्यांनी परिषदेला पत्र दिले आहे. कांबळी यांच्यावर नाराज असलेल्या नियामक मंडळ सदस्यांनी परिषदेला दिलेल्या पत्रावर अध्यक्ष म्हणून नरेश गडेकर यांनी भूमिका घ्यावी असे नियामक सदस्यांना अभिप्रेत असल्याने आता या समस्यांवर कोण तोडगा काढणार असाही प्रश्न आहे. तसेच गेली दीड वर्षे करोनामुळे परिषदेचे कामकाज थांबल्याने नियामक मंडळ सदस्यांची ऑनलाइन बैठक घेऊन पुढील दिशा ठरवावी. ऑनलाइन सभा सध्या शासन पातळीवरही घेतल्या जात असल्याने घटनेवर बोट ठेवू नये, असे सूचक विधानही या पत्रात केले आहे.

याबाबत विचारले असता, परिषदेतील अंतर्गत बाबींना विरोधाचा रंग फासून लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचे काम काही नियामक मंडळ सदस्य करीत असल्याचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचे म्हणणे आहे. ‘पावसाळ्यात नाट्यगृहात अशा पद्धतीची गळती दरवर्षी होत असते आणि त्याची दुरुस्तीही केली जाते. गळती झालेली जागा सुकल्यानंतर तातडीने ती दुरुस्त होईल. असे मुद्दे उचलून भांडवल करणे योग्य नाही.’ असे कांबळी म्हणाले.

थकलेले वेतन तातडीने देण्यात यावे, असे पत्र ईमेलद्वारे संकुलाचे व्यवस्थापक सुनीलकदम यांनी परिषदेला २ एप्रिल रोजी दिले होते. ‘परिषदेच्या यशवंतराव नाट्य संकुलातील कर्मचाऱ्यांचे फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यांचे पगार थकले आहेत. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आल्याने पगार आणि निर्वाह निधी तातडीने देण्यात यावा,’ असे पत्रात नमूद करण्यात आले होते. या ईमेलची प्रत माध्यमांवर फिरवली गेल्याने हे प्रकरण उघडकीस आले आहे.

कर्मचाऱ्यांना पगार देणाऱ्या परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात पोहोचणे गरजेचे आहे. कठोर निर्बंधामुळे कुणीही कार्यालयात जात नसल्याने वेतन खोळंबले आहे. कर्मचाऱ्यांचा पगार थकवून आम्हाला काय मिळणार. जसे निर्बंध उठतील तसे पगार दिले जातील. व्यवस्थापकांनी २ एप्रिलला दिलेले पत्र २० मे रोजी माध्यमासमोर आणून या घटनांना चुकीची दिशा देण्याचे काम काही लोक करत आहेत.

  • प्रसाद कांबळी, अध्यक्ष – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद