चॅट विंडो
‘गंमत जंमत’ (१९८७) या आपल्या पहिल्याच चित्रपटापासून लोकप्रिय असलेल्या वर्षा उसगांवकरच्या भेटीचे योग अनेक. यावेळी निमित्त तिची भूमिका असलेला ‘जॉवयं नंबर एक’ हा चित्रपट.

‘जॉवयं नंबर एक ‘ या कोंकणी चित्रपटाला खूपच चांगले यश मिळाल्याचे समजले.

वर्षा – होय, हा माझा पहिलाच कोंकणी चित्रपट आणि मला या भाषेतील चित्रपटातून भूमिका करायचीच होती. माझी पहिली भाषा मराठी, पण मी गोव्याची असल्याने आपण कधी तरी कोंकणी भाषेतील चित्रपटात अभिनय करावा असे मला वाटत होतेच. आता या चित्रपटाला कर्नाटकचा काही भाग आणि गोव्यातील पणजी, म्हापसा, मडगाव येथे खूपच उस्फूर्त प्रतिसाद मिळाले आणि खूप खूप आनंद झाला. गोव्यात तर इतका आणि असा प्रतिसाद मिळाला की, त्याचे खेळ वाढवावे लागले. मुंबईतही या चित्रपटाचे खेळ आयोजित केले आहेत.

कर्नाटकमध्ये काही चित्रपटगृहावर मोठी कट्आऊट लागल्याचे फोटो पाहिले.

वर्षा – होय तर, मी तर ते पाहून केवढी तरी आनंदले. आतापर्यंत आपण रजनीकांत इत्यादी साऊथच्या कलाकारांची अशी भव्य कट्आऊटस पाहत आलोय,  आता आपलेही असे कित्येक फूटाचे कट्आऊट पाहताना मजा आली. या चित्रपटाने असाही एक योग घडवून आणला. या चित्रपटाच्या ज्या ज्या खेळांना मी जेथे जेथे हजर राहिले ते सगळेच योग सुखावणारे ठरले. रसिकांना चित्रपटही आवडला आणि माझे कामही आवडले.

आतापर्यंत किती भाषांच्या चित्रपटातून भूमिका साकारल्या?

वर्षा – एकूण आठ! मराठी, हिंदी, बंगाली, भोजपुरी, कोंकणी,  राजस्थानी इत्यादी. बंगाली चित्रपटात माझ्यासोबत सुबोध भावे होता. तरी कन्नडमध्ये मी काम करु शकले नाही, फार पूर्वी दक्षिणेकडील स्टार कृष्णा यांच्यासोबत एका चित्रपटाची ऑफर होती. पण त्या भूमिकेसाठी काही अधिकच मोकळी वस्रे परिधान करायची होती, म्हणून मी नाही म्हटले. आता मात्र त्या तुलनेत अधिकच फॅशनेबल कपडे परिधान केले जातात असे दिसते. पण इतर अनेक भाषांमध्ये काम केल्याने त्या चित्रपटसृष्टीतील वातावरण आणि कामकाज यांचा येणारा अनुभव एक कलाकार आणि माणूस म्हणूनही नवीन काही देणारा असतो. अर्थात, असे जरी असले तरी मराठी चित्रपट आपला आहे, आणि त्यात काम करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण आता मराठीत काही विशेष काही करुन दाखवण्याजोग्या चांगल्या भूमिका मला करायच्यात, आता चित्रपटाची संख्या वाढवायची नाही. माझी भूमिका असलेले ‘वळण’ वगैरे काही मराठी चित्रपट पूर्ण झालेत. अधेमधे एकाद्या हिंदी अथवा मराठी मालिकेत काम करणे सुरू असते.

आणि दीर्घकाळ असलेल्या गायनाच्या आवडीत काही नवीन?

वर्षा – पूर्वी मी ‘वर्षा उसगांवकर नाईट’ या माझ्याच नावाने असलेल्या कार्यक्रमात भरपूर गायले, त्याचे महाराष्ट्रात शो देखील अनेक झाले. मला वाटते, त्यामुळेच मी माझ्या चाहत्यांसमोर सतत राहिले आणि त्यांचाही मला थेट प्रतिसाद मिळत राहिला. गायनाबद्दल सांगायचे तर, कोंकणी गाणे शिकावे आणि त्याचा एक संग्रह प्रकाशित व्हावा असे वाटते. मला अभिनयाइतकीच गाण्याचीही खूप आवड आहे.
दिलीप ठाकूर