आलिया भट्ट आणि वरुण धवन यांनी आतापर्यंत तीन सिनेमांत एकत्र काम केले असून हे तीनही सिनेमे ब्लॉकबस्टर होते. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना एवढी भावली होती की या दोघांचे अफेअर तर चालू नाही ना असा प्रश्न त्यांना पडला होता. पण वरुण धवन डिझायनर नताशा दलालला डेट करत असल्याच्या बातम्या समोर आल्या आणि या दोघांच्या लव्ह अफेअरवर पूर्णविराम लागले. नुकतेच वरुणने आलियाला किस करण्यास सपशेल नकार दिल्यामुळे वरुणचे चाहते थोडे नाराज झाले आहेत.

‘बद्रीनाथ की दुल्हनिया’चे स्टार्स एका जाहिरातीसाठी पुन्हा एकत्र आले आहेत. या जाहिरातीत आलिया कचरा फेकताना दाखवण्यात आली आहे. ती वरुणला किस करण्यास सांगते. पण रस्त्यावर कचरा फेकण्याचा प्रकार पाहून वरुण तिला किस करण्यास नकार देतो. या जाहिरातीत एका छोट्या शहरातील रोमियो आणि ज्युलिएटची प्रेम कहाणी दाखण्यात आली आहे.

वरुणच्या आगामी सिनेमांबद्दल बोलायचे तर तो लवकरच शूजित सरकार यांच्या ‘ऑक्टोबर’ सिनेमात दिसणार आहे. तर आलिया भट्ट मेघना गुलझार यांच्या ‘राझी’ सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

काही दिवसांपासून वरुण आणि त्याची प्रेयसी नताशा दलाल यांच्या नात्यात वादळ आल्याचे म्हटले जात आहे. दोघांमध्ये काही कारणांमुळे दुरावा आल्याने या दोघांचे ब्रेकअप झाल्याचे म्हटले जात आहे. नताशाला त्यांचे नाते पुढे नेत लग्नबंधनात अडकायचे आहे तर वरुणला सध्या लग्न करायचे नाही. त्यांच्यातील या वादामुळेच दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दिवाळीत अनिल कपूर यांनी आयोजित केलेल्या पार्टीत एकटा वरुणच आला होता. नताशा मात्र तिच्या मैत्रिणींसोबत बँकॉकमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत होती.