सोशल मीडियावर आपलं मतं मांडणं किंवा आपले विचार व्यक्त करण्याचं स्वतंत्र्य सगळ्यांनाच आहे. मात्र अनेकदा नेटकऱ्यांकडून याचा दुरुपयोग केला जातो. काही नेटकरी सोशल मीडियावरून एखाद्या व्यक्तीवर किंवा समाजावर चुकीच्या पद्धतीने कमेंट करतात. यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. नुकतंच एका यूट्यूबरने अरुणाचल प्रदेशाच्या एका आमदारावर वर्णभेदी वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर मात्र बॉलिवूडमधील काही सेलिब्रिटींनी या युट्यूबरचा समाचार घेतला.

यूट्यूबर पारस सिंह उर्फ बंटीने एक व्हिडीओ शेअर केला होता. यात त्याने अरुणाचल प्रदेशचे आमदार निनॉन्ग इरिंग यांचा उल्लेख ते ‘गैर-भारतीय’ आणि चाय़नीज असा केला होता. बंटीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर अभिनेता राजकुमार रावने देखील नाराजी व्यक्त केली. हे कृत्य अयोग्य आहे. असं म्हणत राजकुमारने संताप व्यक्त केला. तर आता अभिनेता वरुण धवन देखील या यूट्यूबरवर चांगलाच संतापला आहे.

‘स्त्री’ सिनेमाचे दिग्दर्शक अमर कौशिक यांनी सोशल मीडियावर या प्रकरणी एक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट वरुण धवनने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे. “अरुणाचल प्रदेशमध्ये बराच वेळ घालवल्यानंतर आता आपण स्वत:ला आणि इतरांना या गोष्टीबद्दल शिक्षित करण्याची वेळ आली आहे की हे किती चुकीचं आहे.” असं म्हणत वरुणने नाराजी व्यक्त केली.

rajkumar rao-varaun-dhawan-post

अशा अज्ञांनी लोकांचा निषेध करणं गरजेचं

दिग्दर्शक अमर कौशिक त्याच्या पोस्टमध्ये म्हणाले होते, “आपला देश आणि प्रदेशाबद्दल अनभिज्ञ असणं म्हणजे मूर्खपणा आहे. मात्र हे अज्ञान एखाद्या आक्षेपार्ह पद्धतीने व्यक्त केलं जातं तेव्हा ते विषारी होतं. आपण सर्वांनी अशा अज्ञांनी लोकांचा निषेध करणं गरजेचं आहे. यापुढे हे कधीच सहन केलं जाणार नाही. हे या मूर्खांना समजावणं गरजेचं आहे.” असं अमर कौशिक त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले होते.

काय आहे प्रकरण?

अरुणाचल प्रदेशचे आमदार निनॉन्ग इरिंग यांनी नुकतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहलं होतं. या पत्रात त्यांनी बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडियाच्या रुपात पुन्हा एकदा लॉन्च होणाऱ्या पबजी गेमवर बंदी घालण्याची मागणी केली होती. याच मुद्द्यावर एक व्हिडीओ शेअर करत बंटीने निनॉन्ग यांच्यावर वर्णद्वेषी वक्तव्य केलं होतं. त्याचसोबत अरुणाचल प्रदेश हा भाग भारताचा नसून चीनचा होता असं वक्यव्य देखील बंटीने त्याच्या व्हिडीओत केलं होतं. या प्रकरणानंतर बंटीवर ईटानगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर बंटीने आणखी एक व्हिडीओ शेअर करत माफीदेखील मागितली होती. लुधियाना पोलिसांनी कारवाई करत बंटीला ताब्यात घेतलं आहे.