सध्या कलाविश्वामध्ये लग्नाचा माहोल आहे. या नव्या वर्षात अनेक लोकप्रिय सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेता वरुण धवन आणि नताशा दलाल यांनी लग्न केलं. त्यामुळे सध्या या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे वरुणच्या लग्नानंतर आता अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

वरुणने नताशासोबत लग्नगाठ बांधल्यानंतर प्रत्येक माध्यमातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यामुळे तोदेखील शक्य तितक्या जणांना रिप्लाय देत आहे. यामध्येच प्रसिद्ध छायाचित्रकार रोहन श्रेष्ठा याच्या पोस्टला वरुणने रिप्लाय दिला आहे. विशेष म्हणजे वरुणने केवळ रिप्लायच दिला नाही तर रोहन आणि श्रद्धा कपूरच्या लग्नाचे एक प्रकारे संकेतच दिले आहे.

“वरुण आणि नताशा खूप शुभेच्छा. एकदा का तुम्हाला समजलं की मग सारं काही आपोआप समजू लागतं. वरुण धवन तू नशीबवान आहेस”, असं म्हणत रोहनने वरुण-नताशाला शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर वरुणनेदेखील त्याला रिप्लाय दिला. वरुणने रोहनची ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केली होती. यावर, “खरंच मी नशीबवान आहे. आशा आहे तू सुद्धा या सगळ्यासाठी तयार असशील”, असा रिप्लाय वरुणने दिला. विशेष म्हणजे वरुणचा हा रिप्लाय पाहून नेटकऱ्यांनी याचा संबंध थेट श्रद्धा कपूर आणि रोहन श्रेष्ठाच्या लग्नाशी जोडला आहे.

वाचा : ‘तांडव’ला दिलासा नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिला दणका

गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा कपूर,रोहन श्रेष्ठाला डेट करत असल्याची चर्चा रंगली आली. इतकंच नाही तर गेल्या वर्षी ही जोडी लग्न करणार असल्याचं देखील म्हटलं जात होतं. याविषयी सोशल मीडियावरही चर्चांना चांगलंच उधाण आलं होतं. मात्र, अद्याप तरी या दोघांनी याविषयी मौन बाळगलं आहे. परंतु, तरीदेखील चाहत्यांमध्ये त्यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे.