तगडी स्टारकास्ट, बिग बजेट चित्रपट, डोळे दिपवणारे सेट्स हे सर्व असूनही करण जोहरचा ‘कलंक’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटला. प्रेक्षक-समीक्षकांकडून या चित्रपटाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नव्हता. यामध्ये मुख्य भूमिका साकारलेला अभिनेता वरुण धवन पहिल्यांदाच व्यक्त झाला आहे. वरुणच्या करिअरमधील हा पहिला फ्लॉप चित्रपट ठरला होता. या अपयशाचा परिणाम आपल्यावर झाल्याचं वरुणने म्हटलं.

२०१२ मध्ये ‘स्टुडंट ऑफ द इअर’मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या वरुणचे आतापर्यंतचे ११ चित्रपट हिट ठरले. मात्र ‘कलंक’ हा चित्रपट त्याच्या करिअरलाच जणू ‘कलंक’ ठरला. ‘मला अपयशाचा फार त्रास झाला. प्रेक्षकांना जर चित्रपट आवडला नाही तर तो साहजिकच चांगली कमाई करू शकणार नाही. माझ्यासाठी हा एक धडा होता. त्यातून मी बरंच काही शिकलो,’ असं वरुण म्हणाला.

Video : ‘बदन पे सितारे’ गाण्यावर रणवीर व सुनील गावस्कर यांचा डान्स पाहिलात का?

याविषयी पुढे तो म्हणाला, ‘कधी कधी काही गोष्टी मनाजोगत्या घडत नाहीत आणि मग पुढे सगळंच फिसकटतं. आयुष्यात पहिल्यांदाच मी अपयशाला सामोरं जात होतो आणि त्याचा माझ्यावर खूप परिणाम झाला. पण एका अर्थाने हे चांगलंच झालं. मला त्यातूनही खूप काही शिकायला मिळालं.’

अभिषेक वर्मन दिग्दर्शित ‘कलंक’ या चित्रपटात वरुण धवन, आलिया भट्ट, संजय दत्त, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर व सोनाक्षी सिन्हा यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. वरुण सध्या त्याच्या आगामी ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. त्याचसोबत तो ‘कूली नंबर १’च्या रिमेकमध्येही मुख्य भूमिका साकारणार आहे.