करोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. चीनपासून उद्रेक झालेल्या या विषाणूने संपूर्ण जग कवेत घेतलं आहे. त्यामुळे जगावरचं संकट काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आतापर्यंत ९० पेक्षा अधिक देशांमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. यात भारताचाही समावेश आहे. अनेक सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत बऱ्याच जणांना याची लागण झाल्याचं पाहायला मिळत आहे. यामध्ये अभिनेता वरुण धवनच्या कुटुंबातील सदस्यांना देखील करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.

सध्या लॉकडाउनमुळे चित्रपट, मालिका, वेबसीरिज, नाटक यांचं चित्रीकरण बंद असल्यामुळे सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात आहेत. यामध्येच वरुणने अलिकडेच एका इन्स्टाग्राम लाइव्ह चॅटमध्ये सहभागी झाला होता. यावेळी त्याने त्याच्या नातेवाईकांना करोनाची लागण झाल्याचं सांगितलं.

‘हिंदुस्तान टाइम्स’नुसार, जगात करोनाचा प्रसार वाढत असतानाच माझ्या कुटुंबातील काही सदस्यांनाही करोनाची लागण झाली आहे. माझ्या कुटुंबातील काही जण अमेरिकेत राहतात त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. जोपर्यंत तुमच्या जवळच्या व्यक्तीवर एखादं संकट कोसळत नाही तोपर्यंत तुम्हाला त्या परिस्थितीची जाणीव नसते. त्यामुळे हा विषाणू प्राणघातक आहे हे लोक समजून घेत नाहीयेत. त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो कृपा करुन घरात रहा, सुरक्षित रहा, असं वरुणने या चॅट शोमध्ये सांगितलं.

त्याने या शोमध्ये त्याची मैत्रीण आणि अभिनेत्री जोओ मोरानीविषयीही व्यक्त झाला. २० मार्च रोजी जोओने तिची तब्येत खराब झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी खोकला झाला आणि श्वास घेण्यास अडथळा येत असल्याचं सांगितलं. अखेर करोनाची चाचणी केल्यानंतर तिचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले.

दरम्यान, भारतातही करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. आतापर्यंत भारतात सात हजारांपेक्षा जास्त जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी २३९ जणांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.