नव्वदच्या दशकात गोविंदाच्या ‘कूली नंबर १’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. विनोदी चित्रपटांची एक लाटच त्याकाळी आली. गोविंदाच्या चित्रपटांची लोकप्रियता अजूनही कमी झालेली नाही. गोविंदा-करिश्मा, कादर खान यांचा ब्लॉकबस्टर ठरलेला ‘कूली नं १’ या चित्रपटाचा रिमेक लवकरच येणार आहे. वरुण धवन या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या रिमेकची निर्मिती वरुणचा भाऊ रोहित धवन करणार असून दिग्दर्शन डेव्हिड धवनचे आहे.

या चित्रपटाचे शूटिंग काही महिन्यांमध्ये सुरू होणार आहे. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, कादर खान यांची भूमिका अभिनेते परेश रावल साकारणार आहेत. सारा अली खान यांच्या वडिलांच्या भूमिकेत ते दिसणार आहेत. ‘होशियार चंद’ ही भूमिका ते साकारणार असून ही विनोदी व्यक्तिरेखा आहे. बँकॉकमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

या वृत्तामध्ये असेही म्हटले आहे की, या चित्रपटाच्या मुळ कथानकात काळानुसार काही बदल करण्यात येणार आहेत. साराच्या बहिणीची भूमिका कोणती अभिनेत्री साकारणार याबाबत सुद्धा अनेक चर्चा आहेत. कदाचित दिशा पटानी या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे.