बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याचा आगामी चित्रपट कुली नंबर १मुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात तो वेगवेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. वरुणसोबत या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पण सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तो त्याच्या चाहत्यांना ‘तुमच्या वहीनीशी ओळख करुन देतो’ असे बोलताना दिसत आहे.

नुकताच वरुणने त्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. ‘आयुष्यात खूप गोष्टी लपवल्या आहेत. आता मी आणखी लपवू शकत नाही. बऱ्याचदा अनेक अफवा पसरवल्या जातात आणि त्यावर तुम्ही काही बोलू शकत नाही. म्हणून मी आता एक निर्णय घेतला आहे की उद्या तुमची होणाऱ्या वहिनीशी ओळख करुन देतो’ असे वरुण व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.

Coolie no. 1 trailer : गोविंदा की वरुण? ट्रेलर पाहून तुम्हीच ठरवा कोण आहे ‘कुली नं. १’

वरुणचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तो उद्या त्याच्या लग्नाबाबत घोषणा करणार असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांपासून वरुण गर्लफ्रेंड नताशा दलालमुळे चर्चेत आहे. तो लवकरच लग्न बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता उद्या वरुण लग्नाची घोषण करणार का? हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

‘कुली नंबर १’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये सारा आणि वरुणसोबत परेश रावल, जावेद जाफरी, जॉनी लीवर, राजपाल यादव हे कलाकार दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती वासू भगनानीने केली आहे. हा चित्रपट २५ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘कुली नंबर १’ हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झालेल्या कुली नंबर १ चा रिमेक आहे.या चित्रपटात अभिनेता गोविंदा आणि आभिनेत्री करिश्मा कपूर यांनी मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.