काही व्यावसायिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्यानंतर आता अभिनेता वरुण धवन चौकटीबाहेरील भूमिका साकारण्यास सज्ज झाला आहे. ‘ऑक्टोबर’ या चित्रपटाच्या घोषणेनंतर त्याच्या आगामी ‘सुई धागा’ या चित्रपटाची जोरदार चर्चा होत आहे. ‘यश राज फिल्म्स’ बॅनरअंतर्गत बनत असलेल्या या चित्रपटासाठी वरुणने तयारी सुरू केली आहे.

या चित्रपटात अनुष्का शर्मासुद्धा मुख्य भूमिका साकारणार आहे. ‘यश राज फिल्म्स’ने सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये वरुण शिवणकाम शिकताना दिसून येत आहे. टेलरची भूमिका साकारण्यासाठी तो तयारीला लागला आहे. तर विराट कोहलीशी नुकतीच विवाहबंधनात अडकलेली अनुष्का हनिमून आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशननंतर चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. वरुण आणि अनुष्काचा एकत्र हा पहिलाच चित्रपट असल्याने ही नवीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

PHOTOS : विराट-अनुष्काची ‘पोस्ट वेडिंग’ धमाल पार्टी

‘सुई धागा’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शरत कटारिया करणार आहेत. कटारिया यांचा ‘दम लगा के हैशा’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर चांगलाच गाजला होता. जानेवारीत चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून २८ सप्टेंबर, २०१८ रोजी तो प्रदर्शित होईल.