वसई : नायगाव पूर्वेतील जुचंद्र येथील  स्वप्नील भोईर व त्यांच्या “वि अनबिटेबल” डान्स ग्रुपची अमेरिका येथे सुरु असलेल्या  “अमेरिका गॉट टॅलेंट ” या आंतरराष्ट्रीय नृत्य स्पर्धेमध्ये आपले नृत्य कलेतील कलाकौशल्य दाखवत या तरुणांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.

याआधी देखील डान्स प्लस ४ या नृत्य स्पर्धेमध्ये त्यांनी उत्तम कामगिरी केली होती.  त्याच पार्श्वभूमीवर  अमेरिकेच्या धर्तीवर अमेरिका वासीयांची मने जिंकण्याची संधी या ग्रुपला मिळाली. या मिळालेल्या संधीचा या मुलांनी चांगलाच फायदा केला आहे. वि अनबिटेबल  ग्रूप चित्तथरारक व श्वास रोखायला लावणारे स्टंट व डान्स परफॉरमन्स साठी प्रसिद्ध आहे. यामध्ये नायगाव जूचंद्र, भाईंदर, नालासोपारा येथील मुलांचा समावेश आहे. या मुलांनी स्वप्नील भोईर व ओमप्रकाश चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली अमेरिकेत सुरु असलेल्या अमेरिका गॉट टॅलेंट शो मध्ये कला सदर केली आहे. नुकताच त्यांनी गोल्डन बझर मिळवत उपांत्य फेरी गाठली आहे.  स्पर्धेमध्ये सर्वाधिक चांगले कौशल्य दाखवता यावे यासाठी दररोज ७ ते ८ तास सराव केला जात आहे.

“अमेरिका गॉट टॅलेंट” मध्ये कला सादर करण्याची संधी मिळणे, हे आम्हा सर्वांसाठी अभिमानास्पद असून यामध्ये आमच्या गटाची उपांत्यपूर्व फेरी साठी निवड झाली आहे. त्यामुळे सर्वाधिक आनंद झाला आहे. आम्ही सादर करीत असलेल्या कलेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. यामध्ये वसई विरार, मुंबई, ठाणे, पालघर यासह  ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, ग्रीस अशा परदेशातील नागरिक सुद्धा आम्हाला प्रेरित करीत आहे. आता उपांत्य फेरीसाठी सर्वाधिक जोमाने तयारी सुरु केली असून अंतिम फेरी गाठून आपल्या देशाचे नाव उंचावण्यासाठी सर्वतोपरी प्रय करणार असल्याचे स्वप्नील भोईर यांनी सांगतले आहे.