मुंबई विद्यापीठातील अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सतर्फे २२ ते २९ मार्चदरम्यान आठवा राष्ट्रीय वसंत नाटय़ोत्सव साजरा होणार आहे. अल्पावधीत मुंबईतील एक महत्त्वाचा राष्ट्रीय नाटय़महोत्सव म्हणून ओळख प्राप्त केलेला हा महोत्सव सांताक्रूझ येथील विद्यानगरी कॅम्पसमधील कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवनमध्ये होणार असून, त्यात दररोज संध्याकाळी ७ वा. देशभरातील विविध प्रांतांतील बहुभाषिक नाटकांचे प्रयोग सादर होतील. या नाटय़ोत्सवात मराठीतील अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित ‘लेझीम खेळणारी पोरं’ हा काव्याधारित रंगाविष्कार तसेच महेश एलकुंवारलिखित व चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ या दोन नाटकांचा समावेश आहे. महोत्सवात ‘रंगवेध’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले आहे.
पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर आणि दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा यांच्या सहकार्याने आयोजित या नाटय़ोत्सवाचा प्रारंभ रविवारी, २२ मार्च रोजी अभिनय, कल्याण या संस्थेच्या ‘लेझीम खेळणारी पोरं’ या संजय कृष्णाजी पाटील यांच्या कवितांवर आधारित नाटय़ाविष्काराने होईल. २३ मार्चला ‘पोस्टकार्डस् फ्रॉम बारडोली’ हे जैमिनी पाठक दिग्दर्शित इंग्रजी नाटक सादर होईल, तर २४ मार्च रोजी आसाममधील प्रयोगशील रंगकर्मी पोबित्रा राभा यांच्या ‘किनो काओन’ (काय बोलावं?) या आगळ्यावेगळ्या नाटकाचा प्रयोग सादर होईल. हे नाटक देशातील निरनिराळ्या प्रांतांतील २२ बुटक्यांना घेऊन बसविण्यात आले आहे. २५ मार्चला क्लोन थिएटरची संकल्पना राबविणाऱ्या बन्सी कौल यांचे ‘सौदागर’ हे नाटक होईल. रंगविदुषक, भोपाळ या संस्थेची ही निर्मिती आहे. २६ मार्च रोजी अनुराग कला केंद्र, बिकानेर या संस्थेच्या ‘चार कोट’ या सुदेश व्यास दिग्दर्शित राजस्थानी नाटकाचा प्रयोग होईल. तर २७ मार्चला नाटककार महेश एलकुंवारलिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘वाडा चिरेबंदी’ या सध्या रंगभूमीवर गाजत असलेले नाटक होईल. २८ मार्च रोजी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी दिग्दर्शित केलेले ‘गजब तेरी अदा’ हे हिंदी नाटक सादर होईल. महोत्सवाचा समारोप २९ मार्च रोजी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ची निर्मिती असलेल्या ‘खिलौना नगर’ या दिग्दर्शक सुमन मुखोपाध्याय यांच्या नाटकाने होईल.

अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्समध्ये ‘मृच्छकटिक’चे प्रयोग
मुंबई विद्यापीठाच्या अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स या विभागातील प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून बसविण्यात आलेल्या संस्कृत नाटककार शुद्रक लिखित ‘मृच्छकटिक’ या नाटकाचे प्रयोग २० आणि २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. मुक्ताकाश रंगमंच, लेक्चर कॉम्प्लेक्स, मुंबई विद्यापीठ, विद्यानगरी, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथे होणार आहेत. हिंदी सिने-नाटय़कलावंत हिमानी शिवपुरी यांनी ते दिग्दर्शित केले आहे. नाटकाचे नेपथ्य शिवदास घोडके यांनी केले असून, नृत्यआरेखन सी. गोपालकृष्णन आणि राजश्री शिर्के यांचे आहे. संगीताची धुरा आमोद भट, तर प्रकाशयोजना सागर गुजर हे वाहत आहेत. रंगभूषा उल्लेश खंदारे आणि वेशभूषा स्नेहा यांनी केली आहे. प्रयोगाच्या विनामूल्य प्रवेशिका- अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दुसरा मजला, विद्यानगरी, सांताक्रूझ येथे कार्यालयीन वेळात तसेच प्रयोगापूर्वी एक तास आधी मुक्ताकाश रंगमंच या प्रयोगस्थळी उपलब्ध होतील.
कुमार सोहोनी नाटय़महोत्सव
नाटय़-दिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी आजवर ५१ नाटकांचे दिग्दर्शन केल्याच्या निमित्ताने त्यांच्या नाटकांचा एक महोत्सव २५ ते ३१ मार्च यादरम्यान ठाणे येथील गडकरी रंगायतनमध्ये होणार आहे. त्यात ‘देहभान’ (२५ मार्च), ‘सुखांशी भांडतो आम्ही’ (२६ मार्च), ‘कहानी में ट्विस्ट’ (२७ मार्च), ‘जन्मरहस्य’ (२८ मार्च), ‘मी रेवती देशपांडे’ (३० मार्च) आणि ‘त्या तिघांची गोष्ट’ (३१ मार्च) या नाटकांचा समावेश आहे. महोत्सवाचे उद्घाटन नाटय़ परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, नाटय़संमेलनाध्यक्ष फैय्याज, अभिनेते प्रशांत दामले आणि दीपक करंजीकर यांच्या उपस्थितीत होईल. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर केंद्राने या नाटय़महोत्सवाचे आयोजन केले आहे.