चिन्मय पाटणकर

उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली, की सांस्कृतिक क्षेत्राला बहर येतो. विविध कार्यशाळा, उपक्रम आयोजित होतात. या बरोबर पुण्याची खासियत म्हणजे नाटय़ महोत्सव.. नाटय़ प्रेमींना पुढचे काही दिवस नाटकांची पर्वणी अनुभवता येणार आहे. अभिजात संगीत नाटकांबरोबरच नव्या धाटणीची ग्रिप्स नाटकंही पाहायला मिळणार आहेत.

वासंतिक संगीत नाटक महोत्सव

भरत नाटय़ संशोधन मंदिर या संस्थेचा वासंतिक संगीत नाटक महोत्सव ९ ते १३ मे दरम्यान होत आहे. यंदा महोत्सवाचं २८ वं वर्ष आहे. संगीत ययाती देवयानी या नाटकानं महोत्सवाचा पडदा उघडला असून, पुढील चार दिवसांत उत्तमोत्तम नाटय़पदे असलेले संगीत, अभिनयाचा आनंद घेता येणार आहे.

महोत्सवात संगीत स्वरसम्राज्ञी, संगीत मत्स्यगंधा, संगीत संशयकल्लोळ, कटय़ार काळजात घुसली ही नाटकं सादर होणार आहेत. या नाटकांमध्ये चारुदत्त आफळे, गौरी पाटील, रवींद्र खरे, डॉ. राम साठय़े, संजीव मेंहेदळे, अस्मिता चिंचाळकर, भक्ती पागे, कविता टिकेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

‘सुमारे तीस वर्षांपूर्वी संगीत नाटक अगदीच डबघाईला आले होते. त्या वेळी भरत नाटय़ संशोधन मंदिरातर्फे संगीत नाटकाचा महोत्सव करावा, ही कल्पना नरूभाऊ लिमये यांनी मांडली. त्यासाठी त्यांनी निधीही उपलब्ध करून दिला. भक्ती बर्वे, शरद तळवलकर, रामदास कामत यांच्यासारखा मान्यवर कलाकारांही या महोत्सवाला पाठिंबा दिला. तेव्हापासून दरवर्षी हा महोत्सव आयोजित केला जातो. संगीत नाटकांना बुकिंग मिळत नाही, असं बोललं जातं. मात्र, या महोत्सवाला उत्तम प्रतिसाद असतो. अगदी पंढरपूरपासूनचे प्रेक्षकही खास महोत्सवासाठी येतात,’ अशी माहिती रवींद्र खरे यांनी दिली.

ग्रिप्स नाटकांचा बालरंगमहोत्सव

महाराष्ट्र कल्चरल सेंटर या संस्थेतर्फे बच्चे कंपनी आणि त्यांच्या पालकांसाठी ग्रिप्स नाटकांच्या माध्यमातून सकस मनोरंजन देण्याचं काम सातत्यानं केलं जातं. यंदाही बच्चेकंपनीसाठी बालरंग महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. १२ ते २० मे दरम्यान ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे ग्रिप्स नाटकांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. रोज सायंकाळी ७ वाजता नाटय़प्रयोग होणार आहे. यंदाच्या महोत्सवातून ‘जंबा बंबा बू’ हे नवे नाटक रंगमंचावर येणार आहे. ‘गोष्ट सिम्पल पिल्लाची’ या नाटकानं १२ मे रोजी महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. त्यानंतर ‘तू दोस्त माह्य़ा’, ‘एकदा काय झालं’, ‘आता खेळा नाचा’, ‘बोल बिन्धास’, ‘श्यामची आई’ ही नाटकं सादर होणार आहेत. जंबा बंबा बू या नव्या नाटकाचं लेखन विभावरी देशपांडे, श्रीरंग गोडबोले, दिग्दर्शन राधिका काकतकर इंगळे आणि संगीत गंधार संगोराम यांनी केले आहे. त्यात देवेंद्र सारळकर, अश्विनी फाटक, सक्षम कुलकर्णी, श्रीकर पित्रे, हर्षद राजपाठक, ऋचा आपटे यांच्या भूमिका आहेत. जंगलबुकमधल्या मोगलीला बगिरा आणि बालू शहरात घेऊन येतात. शहरात आल्यानंतर तो शाळेत प्रवेशासाठी जातो. तिथल्या प्रवेश अर्जात धर्म कोणता असे विचारलेले असते. जंगलातले सगळे जण मोगलीला तू माणसाचं पिल्लू आहेस, असं सांगत असल्याने त्याला माणूस हाच धर्म वाटत असतो. त्यानंतर तो बाहेर फिरून धर्म म्हणजे काय हे कसं शोधतो, त्याला काय कळतं याचं नाटय़मय चित्रण या नाटकात करण्यात आलं आहे.

chinmay.reporter@gmail.com