कलाकार हा कलेपेक्षा कधीही मोठा नसतो. मात्र काही कलाकार हे या उक्तीला अपवाद असतात. हे कलाकार कलेला आहे त्यापेक्षाही मोठय़ा उंचीवर नेण्यासाठी प्रयत्न करतात. अशा कलाकारांमध्ये लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा समावेश आहे. लोककलेला वेगळ्या उंचीवर नेण्यामध्ये उमप यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे मत अभिनेता सचिन पिळगांवकर यांनी व्यक्त केले.
वत्सला प्रतिष्ठान आणि लोकशाहीर विठ्ठल उमप थिएटर्सच्या वतीने लोकशाहिरांच्या स्मृतीप्रित्यर्थ रविवारी विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मृद्गंध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी अभिनय आणि दिग्दर्शनाचा पुरस्कार स्वीकारताना सचिन पिळगांवकर यांनी विठ्ठल उमप यांच्याबद्दलचे आपले विचार मांडले. कलाकार हा अमर असतो आणि तो आपल्या कलेच्या माध्यमातूनच त्यांना जिवंत ठेवतो.
लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी सुरू केलेला कलेचा हा जागर उमप यांची पुढची पिढीदेखील यशस्वीपणे पुढे नेत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. यामुळेच कलेची शिकवण ही अव्याहत पणे वाहत आहे. आपल्याला चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करून पन्नास वर्षे झाली असून अशा पुरस्कारांच्या माध्यमातून पाठीवर मिळणारी कौतुकाची थाप ही प्रत्येक कलाकाराला हवी अशीच वाटत असते, असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात लोककलावंत राजूबाबा शेख, लेखनासाठी गंगाराम गव्हाणकर, साहित्यासाठी प्रेमानंद गज्वी, सामाजिक कार्यासाठी नरेंद्र दाभोळकर, प्रकाश योजना शीतल तळपदे, ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर, संगीतकार अजय-अतुल, ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर आणि जेष्ठ सिने अभिनेते रमेश देव यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमात पंढरीनाथ कांबळी, अतुल तोडणकर, उमेश बने, शिवशाहीर सुरेश जाधव, लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर, लोककला आकादमीचे डॉ. गणेश चंदनशिवे यांनी यावेळी आपली कला सादर करत हा पुरस्कार अधिक समृद्ध केला. उमप कुटुंबीयांनी यावेळी सन्मानमूर्तीना सन्मानित केले.