किरण नाकती दिग्दर्शित ‘सिंड्रेला’ सिनेमाचा फर्स्ट लुक आणि म्युझिक लॉंन्च सोहळा सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
या सिनेमाचा ट्रेलर पाहून माझी उत्सुकता वाढली आहे. रुपेश आणि यशस्वी या दोन निरागस मुलांचा अभिनय तर फार कमालीचा आहे. केवळ सिनेमात स्टार मंडळी असून उपयोग नसतो तर सिनेमातील कलाकारांचा अभिनय आणि सिनेमाचा विषय हा महत्वाचा असल्याचे ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांनी आवर्जून नमूद केले. अडीच मिनिटांचा हा ट्रेलर माझ्या मनाला भिडला असून येत्या ४ डिसेंबरला हा सिनेमा नक्कीच एक इतिहास रचेल अशी मला खात्री असल्याचे ही त्यांनी सांगितले. तसेच या सिनेमाचे ५० शोज मी स्वतः घेईन असे जाहीर केले.
मुळात “सिंड्रेला” या नावातच या सिनेमाचे एक वेगळेपण असून या सिनेमाच्या माध्यमातून भावा-बहिणीच्या अनोख्या नात्याची कथा या सिनेमात पहायला मिळणार आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या रुपेश बने आणि यशस्वी वेंगुर्लेकर या बालकलाकारांनी आपल्या अभिनयाची उत्तम चुणूक या सिनेमात दाखवली असून त्यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेता मंगेश देसाईने एक उत्तम व्यक्तिरेखा साकारली असून एका वेगळ्या भूमिकेतून विनीत भोंडेच्या अभिनयाची जादू ही आपल्याला पहायला मिळणार आहे. याकुब सईद व जनार्दन परब यांच्याही सिनेमात महत्वपूर्ण भूमिका आहेत. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, नंदेश उमप आणि गायिका आर्या अंबेकर यांच्या सुमधुर आवाजात या सिनेमाची गाणी रेकॉर्ड करण्यात आली आहेत. भाव-बहिणीच्या अनोख्या नात्यावर भाष्य करणारा “सिंड्रेला” येत्या ४ डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.