अभिनेता कुणाल कपूर सध्या त्याच्या आगामी सिनेमामुळे चर्चेत आहे. ‘वीरम’ या सिनेमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘वीरम’ सिनेमातील कुणालचा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला होता. पोस्टरमध्ये अभिनेता कुणाल कपूर एका योद्ध्याच्या रुपात दिसला होता. दिग्दर्शक जयराज वीरम सिनेमाची निर्मिती करत असून या सिनेमात कुख्यात योद्धा चांतू चेकाची कथानक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. कुणाल कपूरचा आगामी सिनेमातील लूक हा आतापर्यंत त्याने साकारलेल्या सिनेमातील भूमिकेपेक्षा अगदी वेगळा आहे.

आता या सिनेमाचा ट्रेलरही हृतिक रोशनने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा ट्रेलर मल्याळममध्ये आहे. शेक्सपियर लिखित जगविख्यात नाटक ‘मॅकबेथ’वर आधारित या बिग बजेट सिनेमात कुणाल तेराव्या शतकातील केरळमधील योद्धा चंदू चेकवरच्या भूमिकेत दिसत आहे. सत्तेच्या लालसेपोटी होणारा त्याचा संघर्ष अत्यंत भव्यदिव्यपद्धतीने दाखवण्यात आला आहे. राजांसाठी लढाई करणारा एका योद्ध्याच्या भूमिकेत कुणाल कपूर दिसत आहे.

मल्याळम, हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषांत हा सिनेमा बनवण्यात आला आहे. हा सिनेमा ३५ कोटींच्या बजेटसह मल्याळम भाषेतील आतापर्यंतचा सर्वात महागडा सिनेमा ठरला आहे. ‘३००’, ‘हंगर गेम्स’, ‘अवतार’ यांसारख्या सिनेमांचे स्टंट दिग्दर्शन केलेल्या अ‍ॅलन पॉपल्टन यांनी या सिनेमाचेही स्टंट दिग्दर्शित केले आहेत. याशिवाय, हॉलीवूड संगीतकार जेफ रोना यांनी पार्श्वसंगीत, रंगभूषाकार ट्रेफॉर प्राऊड अशा अनेक आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञांनांनी या सिनेमासाठी काम केले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांसाठी निवडण्यात आलेल्या पहिल्या ९१ गाण्यांमध्ये या सिनेमातील ‘वुई विल राईज’ या गाण्याचाही समावेश करण्यात आला आहे. या सिनेमाचा ट्रेलर शेअर केल्याबद्दल कुणाल कपूरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन हृतिक रोशनचे आभार मानले. ‘धन्यवाद डुग्गू!’ असे ट्विट त्याने यावेळी केले.

यापूर्वी कुणाल कपूर कुणालने आत्तापर्यंत वेलकम टू सज्जनपूर (२००८), डॉन(२०११) , लव शव दे चिकन खुराणा (२०१२) ‘रंग दे बसंती’ या सिनेमांमधून अभिनय केला आहे. तसेच त्यानी गेल्यावर्षी अबुधाबी येथे रेसिंग ट्रॅकवर फॉर्म्युला थ्रीचे ट्रेनिंग घेतले होते. त्याने ‘रंग दे बसंती’मध्ये साकारलेल्या व्यक्तिरेखेचे खूप कौतुक झाले होते. निर्माता करण जोहर याच्या गेल्यावर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर प्रदर्शित झालेल्या ‘डिअर जिंदगी’ या सिनेमातही अभिनेता शाहरुख खान आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्यासोबत कुणाल दिसला होता. या सिनेमातील भूमिकेसाठी देखील कुणालचे कौतुक झाले होते. गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डिअर जिंदगी’ या एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे पाहायला मिळाले होते. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर सोशल मीडियावर आणि विशेषत: ट्विटरवर विविध हॅशटॅग लावत या सिनेमाची मोठ्या प्रमाणावर प्रशंसा केली जात होती.

कुणालने त्याची प्रेयसी नैना बच्चन हिच्याशी लग्न केले. नैना बच्चन ही अमिताभ बच्चन यांचे लहान भाऊ अजिताब बच्चन यांची मुलगी आहे. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा हिने या दोघांची ओळख करुन दिली होती.