‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचा कास्टिंग डायरेक्टर क्रिश कपूर याचं ब्रेक हॅमरेजमुळे निधन झालं. अवघ्या अठ्ठाविसाव्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेता. ३१ मे रोजी क्रिशचं निधन झाल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली.

क्रिशचे मामा सुनील भल्ला ‘इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना म्हणाले, “३१ मे रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास क्रिशचं निधन झालं. आम्हा सर्वांसाठी हा खूप मोठा धक्का आहे. कारण त्याला कोणत्याही प्रकारचा आजार नव्हता.” दुपारच्या सुमारास क्रिश घरात अचानक कोसळला आणि त्यानंतर त्याच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागला. ब्रेन हॅमरेजमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं.

क्रिशच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वातून शोक व्यक्त होत आहे. क्रिशचा मित्र आणि कुस्तीपटू संग्राम सिंग याने ट्विट करत त्याच्या भावना व्यक्त केल्या. “खूप लवकर तू आम्हाला सोडून गेलास. तुझ्या खूप काही आठवणी तू आमच्याजवळ सोडून गेला आहेस. तू जिथे कुठे असशली तिथे खूश राहा. तुझ्या आत्म्याला शांती मिळो”, असं ट्विट संग्रामने केलं.

क्रिशने ‘वीरे दी वेडिंग’ आणि ‘जलेबी’ या चित्रपटांसाठी काम केलं होतं. या चित्रपटांमधील भूमिकांसाठी त्याने कलाकारांची निवड केली होती. क्रिशच्या पश्चात त्याची आई, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. इंडियन एक्स्प्रेस