”Veere Di Wedding ” एखादा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याविषयी अनेकजण आपलं मत मांडतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून अमुक एका चित्रपटातील कलाकारापर्यंत आपलं मत पोहोचवणंही फार सोपं झालं आहे. पण, यामुळे कलाकारांना अनेकदा चाहत्यांच्या बोचऱ्या टीकांनाही सामोरं जावं लागतं. अभिनेत्री स्वरा भास्करनेही अशाच प्रसंगाचा सामना केला आहे. ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या निमित्ताने स्वरा पुन्हा एकदा प्रभावी पात्र साकारत प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला खरा. पण, त्यातही स्वरावर टीकेची झोड उठवण्यात आली.

चित्रपटात स्वराने हस्तमैथुनाचं एक दृश्य साकारल्यामुळे सोशल मीडियावरुन तिला अनेकांच्याच प्रश्नांना, प्रतिक्रियांना उत्तरं द्यावी लागली. पण, मुळात एक अभिनेत्री म्हणून त्या दृश्याचं चित्रीकरण करतेवेळीच आपल्यावर या अशा प्रतिक्रिया आणि टीकांची झोड होणार याची अपेक्षा होती, असं स्वराने ‘इंडियन एक्स्प्रेस’शी संवाद साधताना स्पष्ट केलं.

‘या अशा टीकांचा सामना करावा लागेल, याची मला आधीच अपेक्षा होती. पण, एक अभिनेत्री, कलाकार म्हणून त्याकडे पार लक्ष देणं योग्य नाही, असंच मला वाटतं. मला नाही वाटत की अशा लक्ष विचलीत करणाऱ्या, वायफळ आणि मनात भीती निर्माण करणाऱ्या गोष्टींवर आपल्या परफॉर्मन्सच्या वेळी जास्त लक्ष दिलं पाहिजे. कारण, त्याचा काहीच उपयोग नसतो’, असं स्वरा म्हणाली.

‘वीरे…’मधील त्या दृश्यानंतर येणाऱ्या प्रतिक्रिया वाचून आपल्याला कोणताही धक्का बसला नव्हता असंही तिने स्पष्ट केलं. मुळात या प्रतिक्रियांच्या माध्यमातून समाजाची एक बाजूच आपल्यासमोर आल्याचं तिने म्हटलं. हस्तमैथुनाच्या दृश्याविषयीच येणाऱ्या नेटकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नाला तिने उत्तर देत हा चित्रपट एक प्रकारे महिला सबलीकरणाचं उदाहरण ठरतोय, असा आपला दृष्टीकोन मांडला. आपल्या समाजात आजही महिला आणि पुरुषांच्या जीवनशैलीच्या बाबतीत बरेच पूर्वग्रह असल्याचं म्हणत पुरुषांनी कोणतीही गोष्ट केली तर ती योग्य असते. पण, महिलांनी असं काही केलं. तर मात्र ती बोल्ड, वादग्रस्त आणि धक्कादायक बाब ठरते. त्यामुळे मी ट्रोलिंगचा शिकार होणार हे आपल्याला ठाऊक असल्याचं म्हणत स्वराने या सर्व ट्रोल्सना झुगारुन लावलं.

पाहा : kaala video : ‘काला’साठी चेन्नईत अशी साकारली धारावी

दरम्यान, या साऱ्या प्रकरणावर अभिनेत्री सेनम कपूरनेही तिची प्रतिक्रिया दिली होती. त्याशिवाय स्वराच्या आईने या मुद्द्याला अनुसरुन एक वेगळाच दृष्टीकोन मांडला होता.

वाचा : हस्तमैथून आणि सेक्सच्या दृश्यांविषयी स्वरा भास्करची आई म्हणतेय…