शशांक घोष दिग्दर्शित ‘वीरे दी वेडिंग’ हा बहुचर्चित चित्रपट काल प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटाच्या निमित्ताने करिना कपूरने पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ठरलेला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळालं. मात्र ‘वीरे दी..’लोकप्रिय होण्यामागेही काही कारणं आहेत. या काही कारणामुळे चित्रपटाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतल्याचं पाहायला मिळालं.

१. ‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटामध्ये कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत असून प्रत्येक कलाकाराने उत्कृष्ट अभिनय करून आपली छाप पाडली आहे. या चित्रपटाच्यानिमित्ताने करिनाने तैमूरच्या जन्मानंतर  प्रथमच चित्रपटसृष्टीत कमबॅक केलं आहे. करिनाव्यतिरिक्त स्वरा भास्कर, शिखा तल्सानिया, सोनम कपूर या अभिनेत्रीदेखील प्रमुख भूमिकेमध्ये दिसून आल्या आहेत. तसेच  चित्रपटामधून आजच्या काळातल्या स्त्रियांचे प्रतिनिधीत्व करण्यात आले आहे. सर्वसामान्य मुलींप्रमाणे या चौघीदेखील त्यांचं आयुष्य जगत असतात आणि आयुष्यात येणारे चढउतार यात उत्तमरित्या रंगविण्यात आले आहेत.

२. विशेष म्हणजे एक काळ असा होतो जेथे चित्रपटांमध्ये केवळ अभिनेत्यांचा भरणा अधिक असायचा मात्र आता अनेक चित्रपटांमध्ये अभिनेत्रींच्या भूमिका महत्वाच्या ठरु लागल्या आहेत.  त्यातीलच एक चित्रपट म्हणजे ‘वीरे दी वेडिंग’ आहे. हा चित्रपट स्त्रियांवर आधारित असून यात अभिनेत्रींची भूमिका महत्वाची आहे.

३. ‘खुबसुरत’, ‘वैसा भी होता है’, ‘न्याय अन्याय’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे शशांक घोष यांनी उत्तमरित्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. ‘वीरे दी वेडिंग’पूर्वी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘खुबसूरत’ चित्रपटामध्ये फरहान खान आणि सोनम कपूर झळकले होते. त्यानंतर त्यांच्या ‘वीरे दी..’ मध्येदेखील त्यांनी सोनम कपूरची निवड केल्याचं पहायला मिळालं. वीरे दी..ला एकत्र बांधण्याचा पूरेपुर प्रयत्न शशांक घोष यांनी केल्याचं पाहायला मिळतं त्यामुळे चित्रपटाच्या बांधणीसाठी हा चित्रपट नक्कीच बघायला हवा.

४. कोणताही चित्रपट गाण्यांशिवाय अपूर्ण आहे. प्रत्येक चित्रपटामध्ये एक तरी गाणं नक्कीच असतं. त्यातच या चित्रपटामध्ये उत्तम अभिनयाबरोबर उत्तम नृत्य करणा-या अभिनेत्रीदेखील आहेत. त्यातच ‘आ जाओ ना’ आणि ‘तारीफा’ या गाण्यांमध्ये अभिनेत्रींनी आपली जादू दाखविली आहे. त्यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्याचे दिसून आले.

५.  सोनम आणि करिना यांचा ग्लॅमरस अंदाज पाहण्यासाठी तसेच शिखा आणि स्वरा यांच्या रोखठोक संवादशैलीमुळे चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करताना दिसून येतो. यामध्ये चारही अभिनेत्रींनी आपल्या अभिनयाची कास धरली असून प्रत्येक अभिनेत्रीने आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे. त्यामुळे हा चित्रपट पाहणे महत्वाचं ठरत आहे.