27 February 2021

News Flash

….म्हणून ‘वीरे दी वेडिंग’ एकदा पाहाच!

शालेय जीवन संपल्यानंतर या चौघी आपल्या वेगवेगळ्या वाटा निवडतात आणि आयुष्यातील चढउतार त्यांच्या वाट्याला येतात.

वीरे दी वेडिंग

सोनम कपूर, करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तस्लानिया यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट शुक्रवारी (२ जून) प्रदर्शित झाला. आयुष्य स्वच्छंदीपणे जगणाऱ्या या चारजणींभोवती या चित्रपटाचं कथानक फिरताना पाहायला मिळतं. तरुणाईला आपलंस करुन घेण्यासाठी यात हलक्याफुलक्या संवादांचा समावेश करण्यात आला आहे.

‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचं कथानक दिल्लीतील एका शाळेपासून सुरु होतं. शाळेत शिकणाऱ्या अवनी (सोनम कपूर), साक्षी सोनी (स्वरा भास्कर), मीरा (शिखा तल्सानिया) आणि कालिंदी (करीना कपूर) या जीवलग मैत्रिणी आहेत. या चौंघीचीही कौंटुंबिक पार्श्वभूमी वेगवेगळी आहे. मात्र, मैत्रीच्या सुंदर धाग्यामुळे या चारहीजणी जोडल्या गेल्या आहेत. शालेय जीवन संपल्यानंतर या चौघी आपल्या वेगवेगळ्या वाटा निवडतात आणि आयुष्यातील चढउतार त्यांच्या वाट्याला येतात.

दिल्लीतील उच्चभ्रु वस्तीत वाढलेल्या या चौंघींचं कुटुंबही स्वच्छंदी आणि स्वतंत्र विचारसरणीचं असतं. नेमकी याच गोष्टीचा परिणाम या मुलींवर झालेला असतो. रात्री-अपरात्री पार्ट्या करणे, नाईट आऊट करणं या मुलींसाठी रोजचंच झालं असतं. त्यामुळे लग्न करुन एखाद्या बंधनात न अडकण्याचा विचार या चौघी करतात परंतु कालिंदीच्या होणाऱ्या सासू सासऱ्यांनी लग्नाचा घाट घालण्याचा निर्णय घेतल्यामुळे चौघींच आयुष्य बदलतं. कालिंदीच्या लग्नात या चौंघीची पुन्हा एकदा भेट होते आणि येथूनच ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाची खऱ्या अर्थाने सुरुवात होते.
‘व्हाय शूड बॉइज हॅव ऑल फन’ असं म्हणणाऱ्य चौघी आजच्या काळातल्या मुलींचं प्रतिनिधीत्व करताना दिसतात. मात्र दिग्दर्शकांनी केलेला हा प्रयत्न मोठ्या पडद्यावर उतरवताना फारसा यशस्वी ठरलेला नाही असे म्हणावे लागेल. चित्रपटात साक्षी सोनीने पती विनीतबरोबर घटस्फोट घेतला असतो. तर मीराने आपल्या घरातल्यांविरुद्ध जाऊन अमेरिकेतील जॉनबरोबर लग्न केले असते. या दोघांना कबीर नावाचा एक लहान मुलगादेखील असतो. त्याचप्रमाणे अवनी म्हणजे सोनम कपूर ही व्यवसायाने वकील आहे. अखेर त्यांची चौथी मैत्रीण कालिंदी. कालिंदी ऑस्ट्रेलियात शिकत असताना तिची ओळख ऋषभ (सुमित व्यास) याच्याबरोबर होते आणि लग्न करण्यासाठी हे दोघंही ऑस्ट्रेलियामधून दिल्लीला येतात. कालिंदीच्या लग्नाची बातमी मिळताच अवनी, साक्षी आणि मीरा या दिल्लीला लग्नासाठी येतात. १० वर्षानंतर या लग्नात चौंघीची भेट होते. या भेटीत चौघीही त्यांच्या आयुष्यातील चढउतार एकमेकींबरोबर शेअर करतात. आपली सुख दुःख एकमेकींसमोर मांडताना त्या एक तोडगा काढतात. हा तोडगा म्हणजेच चौघींच्या आयुष्यातील सुटलेलं कोडच म्हणावं लागेल. पण नक्की हा तोडगा काय असतो हे जाणून घेण्यासाठी चित्रपट प्रेक्षकांनी नक्कीच पाहायला हवा.

‘वीरे दी..’ हा संपूर्ण चित्रपट या चौंघींच्या आयुष्याभोवती फिरत असून, चौघीही स्पर्धेच्या काळात टिकून राहण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करताना दिसून येतात. विशेष म्हणजे या चित्रपटाची पटकथा उत्कृष्ट असून हा चित्रपट पाहताना प्रेक्षक इतके गुंतून जातात की चित्रपट कधी पुढे सरकतो हे समजतच नाही. सोनम कपूर, शीखा तल्सानिया, स्वरा भास्कर आणि करिना कपूर या चारही अभिनेत्रींनी आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. त्याबरोबरच चित्रपटाचे दिग्दर्शिन, सिनेमेटोग्राफी, चित्रपटासाठी निवडण्यात आलेल्या जागादेखील उत्तम आहे. चित्रपटाचे बजेट ३० कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. चित्रपट व्यापारविश्लेषकांच्या मते या चित्रपटाची कमाई विकेंडच्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. चित्रपटात जरी काही अपशब्दांचा वापर करण्यात आला असला तरी हा चित्रपट तरुणाईच्या विचार क्षमतेच्या जवळ जाणारा असल्यामुळे तरुणाई या चित्रपटाला उत्स्फुर्त प्रतिसाद देऊ शकतात.

‘वीरे दी..’ साठी योग्य अभिनेत्रींची निवड करण्यात आली असून या अभिनेत्रींनी आपल्या अभिनयामुळे स्वत:ची स्वतंत्र छाप उमटविली आहे. मात्र स्वरा आणि शिखा यांनी केलेला अभिनय सोनम आणि करिना या दोघींपेक्षा जास्त प्रभावी ठरला आहे. विशेष म्हणजे या दोन्ही अभिनेत्रींच्या वाट्याला आलेले संवादही चपखल असल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे त्यांचा अभिनय संवाद कौशल्यामुळे परिपूर्ण झाला आहे. सोनमनेही तिच्या पात्राला पूर्ण न्याय दिला असला तरी तिच्या म्हणावे तितके दमदार संवाद आल्याचे दिसत नाही. मात्र या साऱ्यामध्ये काही ठिकाणी करिना ओव्हर अॅक्टींग करताना दिसून आली आहे. तर आयशा रजा, विवेक मुशरान, मनोज पाहवा या कलाकारांनीही आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे.

या चित्रपटामधील गाणी चित्रपटाला धरुन असून यात करण्यात आलेली सिनेमेटोग्राफी चित्रपटाला अधिक आकर्षक करते. मात्र उत्तरार्धात चित्रपट सावकाश गतीने पुढे सरकताना दिसून येतो. त्यातच ‘तेरी पप्पी ले लूं’ हे गाणं प्रेक्षकांना अजिबातच रुचलेलं नाही असं एकंदरीत दिसून आलं. निधी मेहरा आणि मेहुल सुरी यांनी चित्रपटाचं कथानक लिहीताना अनेक पात्रांचा भरणा केला आहे, मात्र या पात्रांची केवळ तोंडओळखच झाली. पुढे या पात्रांचा वावर नगण्य दिसून आला. हा चित्रपट एकत्रित बांधून ठेवणारे दिग्दर्शन या चित्रपटाला आवश्यक होते मात्र यात शशांक घोष थोडेसे कमी पडल्याचे दिसून आले. दरम्यान, केवळ मनोरंजन करण्यासाठी आणि तरुणाईच्या काळातील मज्जा अनुभवण्यासाठी हा चित्रपट नक्कीच पाहता येईल.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2018 1:26 pm

Web Title: veere di wedding movie box office
Next Stories
1 बॉलीवूड म्हणणं बंद करा, हे तर गुलामगिरीचं प्रतीक – भाजपा नेता
2 रेस ३ : ‘या’ नव्या गाण्याला २४ तासातच मिळाले लाखो व्ह्युज
3 video: ‘रेस ३’ मधील तिसरं गाणं ऐकलंत का ?
Just Now!
X