मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com
चर्चा
गेल्या आठवडय़ात ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमाचा ट्रेलर आणि प्रमोशनल गाणं प्रदर्शित झालं. सोनम कपूर, करिना कपूर खान, स्वरा भास्कर, शिखा तल्सानिया आणि सुमित व्यास अशी तगडी कलाकार मंडळी असलेला आणि रिआ कपूर निर्मित ‘वीरे दी वेडिंग’ या सिनेमाची प्रचंड चर्चा सुरू झाली. या सिनेमाचा विषय ज्या-ज्या वेळी सोनमसमोर निघाला आहे त्या प्रत्येक वेळी तिने स्त्रियांची मैत्री या विषयातील बॉलीवूडच्या उदासीनतेबद्दल तिची मतं मांडली आहेत. करिनाचा प्रसूतीनंतरचा हा पहिला सिनेमा असल्याचं निमित्त घेऊन सिनेमाच्या ट्रेलर प्रकाशन सोहळ्यात तिने कलाकारांचं लग्न, मूल झाल्यानंतर अभिनेत्री आणि अभिनेता यांना मिळणाऱ्या वागणुकीतला भेदभाव, स्त्री-पुरुष नटांना मिळणाऱ्या मानधनातील दरी अशा बऱ्याच मुद्दय़ांना हात घातला. तीन मिनिटांच्या ट्रेलरभर पबमध्ये दारू पिणं, अर्वाच्य शब्दांत शिवीगाळ करणं, तारसप्तकात ओरडणं, नातेसंबंधांवर टोकाची मतं मांडणं म्हणजे स्त्री सक्षमीकरण का? असा प्रश्न निर्माण करतानाच ‘तारीफां’ हे प्रमोशनल गाणं प्रसिद्ध झालं. त्यानंतर पडलेला मुख्य प्रश्नच होता, की मुळात सिनेमाला तरुणींच्या मैत्रीची गोष्ट सांगायची आहे की पुरुषांना ‘ऑब्जेक्टिफिशनच्या स्पर्धेत आम्ही तुमच्यापेक्षा कमी नाही’, हे ओरडून सांगायचं होतं?

‘तारीफां’ हे गाणं बादशाहने लिहिलं आणि गायलं आहे. मुळात बादशाह, हनी सिंग, मीत ब्रदर्स, मिका सिंग यांच्या पठडीतील ‘पार्टी कल्चर’ गाण्यांविषयी पुन्हा बोलावं असं काहीच नसतं. गाण्यांचा दर्जा, बोल, संगीत सगळ्याच पातळ्यांवर ही गाणी फोल ठरतात. फक्त दारूच्या नशेत पबमध्ये नाचणाऱ्या गर्दीला ठेका देणं इतकंच त्यांचं कर्तृत्व; पण ‘तारीफां’ या गाण्याची दखल घ्यावी लागते, ते सोनम आणि बहीण रिआ यांनी या सिनेमाच्या निर्मितीमागील मांडलेला त्यांचा उद्देश आणि हे गाणं यामध्ये असलेली प्रचंड तफावत. तीन मिनिटांच्या या गाण्यात मादक कपडे घातलेल्या या चौघींच्या आजूबाजूला घुटमळणारे पुरुष, त्यांना आपल्याजवळ ओढणाऱ्या, प्रसंगी त्यांच्या पार्श्वभागावर फटके मारणाऱ्या, हातातल्या क्रेडिट कार्डच्या बळावर त्यांच्यावर मालकी हक्क सांगू पाहणाऱ्या, हाणामारीवर उतरणाऱ्या या चौघी हे चित्रच दिसतं. एरवी अशा गाण्यांमधून पुरुषांभोवती नाचणाऱ्या मादक ललना दिसतात, पण स्त्रियासुद्धा याबाबतीत कमी नाहीत, हे या गाण्यात दिसतं. बेबी डॉल, ब्ल्यू है पानी, चीटीया कलायिया, साडी के फॉल सा, गंदी बात स्वरूपाच्या गाण्यांचा प्रेक्षकवर्ग आपल्याकडे प्रचंड आहे. या गाण्यांचा आशय, शब्द बाजूला ठेवून डिस्कोथेकमधील तरुण ते शाळेच्या वार्षकि संमेलनात मुलींपर्यंत सगळेच जण यावर नाचतात. अर्थात या गाण्यांमधून स्त्रीबद्दलचं होणारं ‘बाहुली’, ‘बाजारी वस्तू’ असं चित्रण यावर तक्रार करणारा एक वर्ग आहेच; पण या तक्रारीला उत्तर म्हणून पुरुषांचं बाजारीकरण करणं हा न्याय पटतो का? हा विचार करायची गरज या गाण्यामुळे होते.

गाण्याच्या संपूर्ण व्हिडिओतून प्रामुख्याने ‘मर्दानीपणा’ समोर येतो. या मर्दानीपणाला लिंगाचा चेहरा नाही. समोरची व्यक्ती आपली संपत्ती असल्याप्रमाणे त्याच्यावर मालकी हक्क दाखविण्याचा आविर्भाव यात आहे. अगदी गाण्याचं शीर्षक ‘होर दस कितींनी तारीफां चाहिये तेनु,’ हे स्त्रीचं मन जिंकायचा एकमेव मार्ग म्हणजे तिची तोंडभरून स्तुती करणं, या अर्थाचं आहे. ‘किन्ना सवाल करती है, इतना मैं सुनता नहीं,’ यातील दुसऱ्याच्या विचाराबद्दलचा अनादर दिसतो. ‘जीन्स है डाली, डाली तुने जो वो तेरी बुटी पे टाइट’ किंवा ‘मुझे तेरी बॉडी की हर वो चीज लगती सेक्सी’ यातून समोरच्याच्या शरीराबद्दलची वासनेची नजर दिसते. ‘सुरत ए सोनी, सिरत तेरी बेवफा’, ‘लक्क तेरा लीन, बातें तेरी मीन’मध्ये अहंकार दिसतो. मग अशा वेळी प्रश्न पडतो, की आपली मजा, सेलिब्रेशन म्हणजे समोरच्याचा अपमान अशी व्याख्या तर नाही ना? सिनेमाच्या विषयाशी संबंध नसलेल्या प्रमोशनल गाण्यासाठी सकारात्मक गाणंही वापरता आलं असतं, पण हे त्यांनी जाणूनबुजून टाळलं.

गंमत म्हणजे तरुणींच्या मैत्रीवर आधारित असलेल्या या सिनेमातील नायिकांच्या तोंडी असलेलं प्रमोशनल गाणं गाण्यासाठी त्यांना गायिका सापडली नाही. सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, कनिका, नेहा कक्कड, मोनाली ठाकूर अशा उडत्या ठेक्याच्या गाण्यांसाठीही प्रसिद्ध असलेल्या कित्येक गायिकांपकी एकाही गायिकेचा आवाज सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी वापरता येण्याजोगा नाही? या गाण्याचा एकूणच रोख लक्षात घेता सध्या तेजीत असलेल्या बादशाह या खणखणीत नाण्याचा वापर करणं हा एकमेव उद्देश त्यातून येतो. तसंच उद्या डिस्को, रेडिओवर हेच गाणं वाजत असताना ते कोणाच्या तोंडी आहे, ही बाब बाजूला पडते आणि मर्दानी अहंकार तितका लक्षात राहतो. त्यामुळे स्त्री-पुरुष समानतेची लढाई आपण या अहंकाराच्या जोरावर लढणार का? हा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.
सौजन्य – लोकप्रभा