एखादी गोष्ट हातून निसटली की त्याची खरी महती कळते, हे लहानपणापासून सातत्याने कानावर पडणारं वाक्य माणसांच्या बाबतीतही तितकंच खरं आहे याची स्पष्ट जाणीव आपल्याला असते. क्षणाक्षणांचा हिशोब मागणाऱ्या एरव्हीच्या व्यावहारिक आयुष्यात या मानवी जाणिवांवर कित्येक पुटं चढत जातात आणि मग अपघाताने तीच गोष्ट पुन्हा घडते तेव्हा कदाचित व्यवहाराची पुटं चढलेली ती जाणीव नेणिवेच्या पातळीवर उतरते. दिग्दर्शक म्हणून मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या याच जाणिवेला ‘व्हेंटिलेटर’वर असलेल्या माणसाची गोष्ट सांगण्याच्या निमित्ताने राजेश मापुस्कर यांनी पुन्हा जागं केलं आहे.

चित्रपट हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे. साधीशीच गोष्ट असते, माहितीची असते, नेहमी अनुभवाला येणारी असते तरीही दुसऱ्याच्या बाबतीत ती घडताना जेव्हा आपण पाहतो तेव्हा नकळत कुठेतरी आपल्या स्वत:ला चाचपडून पाहण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. मानवी स्वभावाचा नेमका हाच धागा पकडत राजेश मापुस्कर यांनी गैरसमज, राग-लोभ-अहंकारापायी व्हेंटिलेटरवर असलेल्या मानवी नात्यांची गोष्ट या सरळ-साध्या चित्रपटांतून सत्तर कलाकारांच्या मदतीने दाखवून दिली आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच फ्रेम उघडते ती गणेशोत्सवासाठी मुंबई नगरीत ठीकठिकाणी चाललेल्या तयारीच्या निमित्ताने.. गणेशोत्सव तोंडावर असताना कोणीएक वयस्कर गजूकाका कामेरकर बेशुद्ध पडतात आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं जातं. त्यांची प्रकृ ती गंभीर आहे आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं आहे ही वार्ता मुंबई-कोल्हापूर ते कोकण अशा मोठय़ा परिघात विखुरलेली त्यांची बहीण, भाऊ , त्यांची मुलं-नातवंडं, गावकी-भावकीपर्यंत पोहोचते. आणि मग गजूकाकांना काय झालं आहे यापेक्षाही त्यांचा व्हेंटिलेटर काढून घेतला तर गणेशोत्सव काही साजरा होणार नाही, या काळजीपासून ते गावकीत अडक लेल्या आंब्याच्या झाडांपासून संडास बांधण्याच्या अनेक जटिल समस्यांचं काय होणार? या चिंतेत ही मंडळी गजूकाकांना पाहण्यासाठी येतात.

गजूकाकांमुळे मुंबईत आल्यानंतर हक्काचा पहिला निवारा आणि कामाचं बळ मिळालेला आता मोठा दिग्दर्शक झालेला राजा (आशुतोष), त्याचा सख्खा चुलतभाऊ दादा (संजीव शाह), खुद्द गजूकाकांचा मुलगा प्रसन्ना (जितेंद्र जोशी) आणि मुलगी सारिका (सुकन्या कुलकर्णी-मोने) यातला प्रत्येकजण एकमेकांत केवळ नात्याने अडकलेला नाही. त्यांची प्रत्येकाची स्वत:च्या नात्याची अशी एक गोष्ट आहे. ती राजाची आपल्या वडिलांशी भाऊंशी (सतीश आळेकर)सतत फटकून वागण्याची आहे, प्रसन्नालाही आपल्या वडिलांचा गजूकाकांचा राग आहे त्याचं सावट त्याच्या आणि सारिकाच्या नात्यावर पडलं आहे. या खूप छोटय़ा छोटय़ा गोष्टी ज्या प्रत्येक घरात आहेत त्याच पडद्यावर सहजपणे मांडत त्यातून आपल्या सगळ्यांनाच जडलेला नेमका आजार दाखवण्याचा यशस्वी प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. सत्तर कलाकारांच्या गर्दीत प्रत्येकाला स्वत:ची म्हणून ओळख आहे आणि कामही आहे याचं शंभर टक्के श्रेय दिग्दर्शकाच्या मांडणीला आहे. चोख पटकथा तितकेच योग्य कलाकार, नेमके संवाद यातून हा ग्राफ उत्तम बांधला गेला आहे. प्रियांका चोप्राची निर्मिती आणि तिचा चित्रपटातला वावर या दोन्ही गोष्टींची मात्रा बरोबर लागू पडली आहे. आशुतोष गोवारीकर कित्येक वर्षांनी अभिनेता म्हणून चित्रपटात दिसले आहेत. सुरुवातीच्या काही फ्रेममधलं त्यांचं अवघडलेपण सोडलं तर दिग्दर्शक म्हणून त्यांनी आपली भूमिका चांगली वठवली आहे. वडील आणि मुलगा यांच्यातील तणावाची भिंत कोसळून जवळीक निर्माण करणारा क्षण आशुतोष गोवारीकर आणि सतीश आळेकर यांनी अक्षरश: जिवंत केला आहे. जितेंद्र जोशीचा मल्हार, सुकन्या मोनेंची सारिका या प्रमुख पात्रांसह उषा नाडकर्णी, अच्युत पोतदार, निखिल रत्नपारखी, तात्यांच्या भूमिकेतील नाना जोशी प्रत्येकाने आपापल्या वाटय़ाला आलेल्या भूमिका चोख केल्या असल्याने पडद्यावरचं हे कामेरकर कुटुंब त्यांच्या गुणाअवगुणांसह आपल्याला प्रेमात पाडतं. चित्रपटातील तिन्ही गाणी ‘या रे या’, ‘बाबा’ आणि ‘जाई देवा’ श्रवणीय आहेत. निर्मिती-कथा-पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, संगीत सगळ्याच बाबतीत सरस असलेला ‘व्हेंटिलेटर’ हा केवळ चित्रपट उरत नाही. आपलीच गोष्ट आपल्याला नव्याने दाखवून देणारा हा सुंदर भावानुभव आहे.

व्हेंटिलेटर

  • निर्माता – प्रियांका चोप्रा-डॉ. मधु चोप्रा (पर्पल पेबल पिक्चर्स)
  • दिग्दर्शक – राजेश मापुस्कर
  • कलाकार – आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, सतीश आळेकर, सुकन्या मोने-कुलकर्णी, सुलभा आर्या, संजीव शाह, अच्युत पोतदार, निखिल रत्नपारखी, विजू खोटे, उषा नाडकर्णी, स्वाती चिटणीस, बोमन इराणी आणि प्रियांका चोप्रा.