प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगण याचे वडील वीरू देवगण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्यांच्या पश्चात चार मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. विलेपार्ले येथील स्मशानभूमीत सायंकाळी सहा वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार केले जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी वीरू देवगण आजारी होते. वडिल आजारी असल्यामुळे अजयने दे दे प्यार दे चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी काही मुलाखती रद्द केल्या होत्या.

वीरू यांनी लाल बादशहा, इश्क, क्रांती, जान, हकीगत यासारख्या ८० हून आधिक चित्रपटांमध्ये अ‍ॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले आहे. १९९९ मधील ‘हिंदुस्थान की कसम’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता.