बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रविवारी सकाळी मुंबईमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर दिलीप कुमार यांच्या निधनाच्या अफवा देखील पसरू लागल्या होत्या. दरम्यान, आता दिलीप कुमार यांच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंवर दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे.

दिलीप कुमार यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक ट्विट शेअर करण्यात आलंय. यात ” व्हाटस्अपवरील मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. साहेबांची प्रकृती स्थिर आहे. मनापासून केलेल्या तुमच्या प्रार्थनांसाठी धन्यवाद. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ते २-३ दिवसांत घरी परततील.” अशी माहिती देत दिलीप कुमार यांची प्रकृती ठीक असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. हे ट्विट सायरा बानो यांनी केल्याचं म्हंटंल जातंय. तसचं ट्वीट करत सायरा बानो यांनी अफवा पसरवणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली.

हे देखील वाचा: “माझी चप्पल आणा”, यामी गौतमच्या फोटोवर ‘राधे माँ’ म्हणणाऱ्या विक्रांत मेस्सीला कंगनाचं उत्तर

डॉक्टरांनी दिली दिलीप कुमार यांच्या प्रकृतीची माहिती

९८ वर्षांचे दिलीप कुमार यांना मुंबईतील हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात  आलं होतं. ईटाइम्सच्या वृत्तानुसार डॉक्टरांनी दिलीप कुमार यांच्या फुफ्फुसात पाणी जमा झाल्याचं सांगितलं आहे. तसचं त्यांना सध्या ऑक्सीजन सपोर्टवर ठेवण्यात आलं आहे. तर आता दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर असून त्यांना आयसीयूमधून पुन्हा बाहेर काढण्यात आल्याचं डाक्टरांनी सांगितलं आहे.

यापूर्वी मे महिन्यात दिलीप कुमार यांना हिंदूजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण नेहमीच्या काही चाचण्या करण्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे सायरा बानो यांनी सांगितले होते. ‘आम्ही रुग्णालयात केवळ रुटिन चेकअप करण्यासाठी आलो आहोत’ असे सायरा बानो यांनी म्हटले होते.