27 February 2021

News Flash

ज्येष्ठ अभिनेते रविराज कालवश

इतकी वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात काम करूनही ते भाड्याच्या घरात राहत होते.

मराठी, हिंदी, गुजराती चित्रपट आणि मराठी व्यावसायिक रंगभूमीवर २५ वर्षांहून अधिक काळ काम केलेले अभिनेते रविराज यांचे निधन झाले. मुंबईतील विलेपार्ले येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७६ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी उषा, मुलगा प्रितेश व मुलगी पूजश्री असा परिवार आहे.

रविराज यांचे खरे नाव रवींद्र अनंद कृष्णा राव. चित्रपटासाठी त्यांचे ‘रविराज’ असे नामकरण झाले आणि आज ते याच नावाने ओळखले जातात. रविराज यांचा जन्म मंगलोरचा. ते नऊ महिन्यांचे असताना त्यांचे वडील अनंत कृष्णा राव हे नोकरीच्या निमित्ताने मुंबईत आले आणि रविराज मुंबईकरच झाले. कानडी भाषिक असलेल्या रविराज यांचे  शालेय शिक्षण मुंबईतच ‘डीजीटी’ अर्थात ‘धरमसी गोविंदजी ठाकरसी’ या मराठी शाळेत तर इंटपर्यंतचे शिक्षण के. सी. महाविद्यालयात, विज्ञान शाखेतील ‘बीएस्सी’पर्यंतचे पुढील शिक्षण रुपारेल महाविद्यालयात झाले. शाळेत असताना इयत्ता नववीच्या स्नेहसंमेलनात त्यांनी एका नाटकात काम केले होते.

उमेदीच्या काळात काही वर्षे नोकरी केल्यानंतर अचानक त्यांनी अचानक नोकरीचा राजीनामा दिला आणि अभिनेता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेने मेहनत घेतली. ‘आहट’ हा हिंदीतील त्यांचा पहिला चित्रपट. राजा ठाकूर दिग्दर्शित ‘जावई विकत घेणे आहे’ हा त्यांचा मराठी चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटाने रविराज यांना नाव आणि प्रसिद्धी मिळाली. नंतर रविराज यांनी ‘ओवाळिते भाऊराया’, ‘तूच माझी    राणी’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘देवापुढे माणूस’, ‘अजातशत्रू’, ‘दोस्त असावा तर असा’, ‘जावयाची जात’, ‘नणंद भावजय’, ‘भन्नाट भानू’ आदी मराठी चित्रपट केले. ‘अन्यायाचा प्रतिकार’ हा त्यांनी काम केलेला शेवटचा मराठी चित्रपट. रविराज यांनी ‘अचानक’, तीन चेहरे’, ‘एक चिठ्ठी प्यार भरी’, ‘चांद का टुकडा’ आणि गाजलेल्या ‘खट्टा मिठा’ या हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या. यातील ‘थोडा  है थोडे की जरुरत है’ आणि  ‘रोल गोल माकुनिसा’ ही गाणी गाजली. ‘मेघनी रात’, ‘गाजर नी पिपुडी’, जे पीड परायी जानी रे’ आदी गुजराती चित्रपटही त्यांच्या नावावर जमा आहेत.

देखणे व्यक्तिमत्त्व, प्रसन्न आणि हसरा चेहरा असलेले रविराज नंतर रुपेरी दुनिया आणि मायावी झगमगाटापासून पूर्णपणे दूर गेले. इतकी वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात काम करूनही ते भाड्याच्या घरात राहत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2020 12:30 pm

Web Title: veteran actor ravi raj passes away ssv 92
Next Stories
1 CoronaVirus : लंडनवरुन येताच सोनम कपूर आयसोलेशनमध्ये?
2 Coronavirus : करोनापासून बचावासाठी लतादीदींनी दिल्या खास टिप्स
3 Corornavirus : ‘ओम फट् स्वाहा करून टाकूया करोनाचा’; महेश कोठारेंनी शेअर केला तात्या विंचूचा भन्नाट व्हिडीओ
Just Now!
X