बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांना रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहे. छातीतील संसर्गामुळे त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले होते. रुग्णालयाचे कार्यकारी प्रवक्ता डॉ. राम नारायण म्हणाले, शशी कपूर यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने त्यांना शुक्रवारी रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. आता ते घरी आराम करतील. या ७६ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्यास खोकला आणि श्वसनास होत असलेल्या त्रासामुळे कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात २१ सप्टेंबर रोजी भरती करण्यात आले होते. १६० पेक्षा अधिक चित्रपटांमधून भूमिका साकारलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्यास २०१० मध्ये फिल्मफेअरचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. अलिकडेच त्यांच्यावर बायपास सर्जरी करण्यात आली असून, गेल्या काही वर्षापासून त्यांची प्रकृती ठीक नसते.