जेष्ठ बॉलिवूड अभिनेत्री श्यामा यांचे वयाच्या ८२व्या वर्षी निधन झाले. मंगळवारी सकाळी मुंबईत त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन पुत्र आणि एक कन्या असा परिवार आहे. दिवंगत सिनेमॅटोग्राफर फली मिस्त्री हे त्यांचे पती होते.

दिग्दर्शक विजय भट्ट यांनी चित्रपटांसाठी खर्शीद अख्तर यांचे नामकरण ‘श्यामा’ असे केले. गुरुदत्त यांच्या ‘आरपार’ या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्याावर पदार्पण केले. १९६० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बरसात की रात’ आणि ‘आरपार’ या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकांची बरीच प्रशंसा झाली. याशिवाय ‘सावन भादो’, ‘दिल दिया दर्द लिया’ या चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारली होती.

बॉलिवूडमधील चार दशकांच्या कारकिर्दीत श्यामा यांनी सुमारे १७५ चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. ‘शारदा’मध्ये साकारलेल्या भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अभिनेते जॉनी वॉकर यांच्यासोबत त्यांनी ‘छू मंतर’, ‘आरपार’, ‘मुसाफिर खाना’, ‘खोटा पैसा’ आदी चित्रपटात काम केले होते. ‘जॉनी वॉकर’ या चित्रपट श्यामा यांनी अभिनेते जॉनी वॉकर यांची ‘नायिका’ म्हणून काम केले होते.

श्यामा यांच्या पार्थिवावर दुपारी मरिन लाईन्स येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.