‘लोकसत्ता’ची प्रस्तुती
सर्वसामान्य रसिकांपर्यंत अभिजात संगीत पोहोचवण्याचे मोलाचे कार्य करणारा हृदयेश फेस्टिव्हल यंदा ११ ते १३ डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे. ‘लोकसत्ता’ प्रस्तुत या महोत्सवाचे आयोजन विलेपाल्रे (पूर्व) येथील साठय़े महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे. येथे उभारण्यात येणाऱ्या विशेष प्रेक्षागाराला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पी. एन. पोतदार यांचे नाव देण्यात येणार आहे.
महोत्सवाचे हे सव्विसावे वर्ष असून नामांकित व रसिकप्रिय कलाकारांच्या सहभागाची परंपरा ‘हृदयेश’ने यंदाही जपली आहे. सलग तीन दिवस चार सत्रांमध्ये हा महोत्सव होणार असून गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे गायन तसेच ‘लिजंडस मीट’ या शीर्षकांतर्गत रसिकांच्या आग्रहास्तव होत असलेली पं. कुमार बोस व पं. अिनदो चटर्जी यांची तबला जुगलबंदी ही यंदाच्या महोत्सवाची प्रमुख वैशिष्टय़े आहेत. या महोत्सवाच्या प्रवेशिका विलेपाल्रे येथील दीनानाथ मंगेशकर नाटय़गृहात उपलब्ध आहेत. संगीतक्षेत्रात आयुष्य समíपत करणाऱ्या कलाकाराला दिला जाणारा ‘हृदयेश संगीत सेवाव्रती पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ सतारवादक व बंदिश रचनाकार पं. शंकर अभ्यंकर यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती ‘हृदयेश’चे अविनाश प्रभावळकर यांनी दिली. ग्वाल्हेर घराण्याच्या पं. अभ्यंकर यांनी संगीतसाधना हाच श्वास मानून पं. शंकरराव व्यास यांच्याकडून गुरुकुल पद्धतीने सतारीचे शिक्षण घेतले आहे. िहदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात अनेक ज्येष्ठ संगीतकारांकडे त्यांनी सतारवादन केले आहे. पं. अभ्यंकरांनी सुमारे साठ बंदिशीही रचल्या असून अनेक गायकांसाठी त्या उपयुक्त ठरल्या आहेत.

महोत्सव असा रंगणार
* शुक्रवार ११ डिसेंबर, सायंकाळी ६ – पं. जयतीर्थ मेवुंडी (गायन), पं. रुपक कुलकर्णी (बासरी), कला रामनाथ (व्हायोलिन) आणि उस्ताद राशिद खान (गायन)
* शनिवार १२ डिसेंबर, सायंकाळी ६ – राहुल शर्मा (संतूर), गानसरस्वती किशोरी आमोणकर (गायन)
* रविवार १३ डिसेंबर, सकाळी ६.३० – पं. बुधादित्य मुखर्जी (सतार), सायंकाळी ६ – डॉ. व्यंकटेशकुमार (गायन), पं. कुमार बोस आणि पं. अिनदो चटर्जी यांची तबला जुगलबंदी