बालनाटय़ किंवा बालरंगभूमी हा उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री घडविण्याचा पाया आहे. हा पाया लहान वयातच पक्का करून घेतला तर पुढे व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांसाठी कसदार अभिनय करणारे चांगले कलाकार मिळू शकतात. नाटक, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये आघाडीवर असलेल्या अनेक कलाकारांची सुरुवात बालरंगभूमीपासूनच झाली आहे. भक्ती बर्वे, दिलीप प्रभावळकर, अजय वढावकर, मुक्ता बर्वे आणि इतरही अनेक नावे सांगता येतील. बालरंगभूमी किंवा बाल नाटय़ म्हणजे फक्त लहान मुलांचा सहभाग असलेली नाटके हा गैरसमज त्यांनी दूर केला. स्वत: व्यावसायिक रंगभूमीवर काम करत असतानाही बालरंगभूमीच्या विकासाचा ध्यास घेऊन आपले संपूर्ण जीवन बालरंगभूमीसाठी त्यांनी वाहून घेतले. ज्यांच्याशिवाय बाल रंगभूमीचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. ते नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर.
वयाच्या ८२ व्या वर्षांत असलेल्या सुधाताई आता काही शारीरिक व्याधी आणि विस्मरणाच्या आजाराने त्रस्त आहेत. स्मरणशक्तीला थोडा ताण दिला तर काही गोष्टी त्यांना आठवतातही. आता त्या फारशा घराबाहेरही जात नाहीत. जाहीर कार्यक्रमातूनही त्या अभावानेच दिसतात. पण सोलापूरला झालेल्या पहिल्या बाल नाटय़ संमेलनाला या सगळ्यावर मात करून त्या आवर्जून गेल्या होत्या. कारण बालरंगभूमी हा त्यांचा श्वास आहे. ‘पुनर्भेट’च्या निमित्ताने गप्पांच्या सुरुवातीलाच बालरंगभूमी आणि बालनाटय़ चळवळीचा विषय निघाला तेव्हा त्यांनी अशा प्रकारचे स्वतंत्र बालनाटय़ संमेलन आयोजित केल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेचे कौतुक केले. बालनाटय़ संमेलन दरवर्षी आयोजित केले जावे, बालरंगभूमीविषयक विविध प्रश्नांची तेथे चर्चा व्हावी आणि बालरंगभूमीच्या विकासासाठी भरीव व ठोस काम अशा संमेलनांमधून झाले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केली. बालरंगभूमी व बालनाटय़ चळवळीत मी काम केलेच पण माझ्यासह रत्नाकर मतकरी, सुलभा देशपांडे, कांचन सोनटक्के यांचेही योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
बालरंगभूमीच्या कामाची सुरुवात आणि त्यातील योगदानाबाबत सुधाताई म्हणाल्या, नाटय़विषयक शिष्यवृत्ती मिळाल्याने मला प्रशिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जायची संधी मिळाली. तिथे मी तिकडली बालनाटय़े व बालरंगभूमी जवळून पाहिली. बालनाटय़ निर्मितीच्या प्रक्रियेत सहभागी झाले. बालनाटय़ म्हणजे फक्त लहान मुलांनीच काम केलेले नाटक नाही, याची जाणीव झाली. पुढे प्रशिक्षण संपवून त्या मुंबईला परतल्या. बालनाटय़ आणि बालरंगभूमीने त्यांना झपाटून टाकले. यातून ‘मुंबई मराठी साहित्य संघा’च्या सहकार्याने त्यांनी १९५९ मध्ये ‘लिटिल थिएटर’ची स्थापना केली. ‘मधुमंजिरी’ हे लिटिल थिएटरतर्फे सादर झालेले पहिले बालनाटय़. याचे लेखन रत्नाकर मतकरी यांनी केले होते. तर दिग्दर्शन सुधा करमरकर यांचे होते. या नाटकात बाल कलाकारांसह प्रौढ कलाकारही होते. दस्तुरखुद्द सुधाताईंनी यात ‘चेटकिणी’ची भूमिका केली होती. त्यांची ही भूमिकाही खूप गाजली.
बालरंगभूमीसाठी सुधाताई यांचे योगदान खूप मोठे आहे. लिटिल थिएटरच्या माध्यमातून सुमारे २५ बालनाटय़े त्यांनी सादर केली. या सर्व बालनाटकांचे दिग्दर्शन त्यांचेच होते. ‘अलिबाबा आणि चाळीस चोर’, ‘अल्लाउद्दिन आणि जादूचा दिवा’, ‘चिनी बदाम’ या नाटकातून भक्ती बर्वे यांनी काम केले होते. ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’, ‘जादूचा वेल’, ‘गणपती बाप्पा मोरया’ ही त्यांनी सादर केलेली आणखी काही बालनाटय़े. व्यावसायिक रंगभूमीवरही त्यांचे योगदान मोठे आहे. ‘विकत घेतला न्याय’, ‘थॅंक्यू मि. ग्लाड’, ‘पुत्रकामेष्टी’, ‘तो राजहंस एक’, ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘बेईमान’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘वीज म्हणाली धरतीला’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘पती गेले गं काठेवाडी’ अशा व्यावसायिक नाटकातून त्यांनी काम केले. ‘मुंबई मराठी साहित्य संघ’ आणि ‘धि गोवा हिंदू असोसिशन’ या नाटय़संस्थांची निर्मिती असलेल्या बहुतेक नाटकांमधून त्यांच्या भूमिका होत्या. या सर्वच नाटकातील त्यांच्या भूमिका गाजल्या. विद्याधर गोखले लिखित ‘संगीत मंदारमाला’, व्यंकटेश माडगूळकर व वसंत सबनीस लिखित ‘संगीत पती गेले गं काठेवाडी’, वि. वा. शिरवाडकर लिखित ‘आनंद’, पुरुषोत्तम दारव्हेकर लिखित ‘चंद्र नभीचा ढळला’ आदी नाटकांचे दिग्दर्शनही सुधाताईंनी केले.
वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, पु. ल. देशपांडे आदी मातब्बर नाटककारांनी लिहिलेल्या नाटकातून काम करायला मिळाले, याचा त्यांना आनंद आहे. आजवरच्या व्यावसायिक रंगभूमीवरील नाटय़प्रवासात मा. दत्ताराम, मामा पेंडसे, चित्तरंजन कोल्हटकर, शंकर घाणेकर, काशिनाथ घाणेकर यांच्याबरोबर भूमिका करायला मिळाल्या हे आपले भाग्य असल्याचे त्या म्हणाल्या. रंगभूमीवर जेवढी जास्त रमले तेवढी चित्रपट व मालिकांमध्ये रमले नाही. त्यामुळे ‘शकुन अपशकु न’, ‘वळवाचा पाऊस’, ‘डबल ट्रबल’ आदी निवडक मालिकाच आपण केल्याचे त्या सांगतात. सुधाताई यांचे वडील तात्या आमोणकर हे मुंबई मराठी साहित्य संघाशी निगडित होते. त्यामुळे नाटय़कलेचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला होता. पाश्र्वनाथ आळतेकर यांच्या नाटय़ शिबिरात त्या लहान वयात सहभागी झाल्या होत्या. गिरगावातील ‘सेंट कोलंबो’ शाळेत त्यांचे शिक्षण झाले. शाळेच्या स्नेहसंमेलनातील नाटक व अन्य कार्यक्रमांतून त्यांचा सहभाग असायचा. नृत्यगुरू पार्वतीकुमार यांच्याकडे त्यांनी नृत्याचेही धडे काही काळ गिरविले.
मी व ललिता (आत्ताच्या केंकरे) आम्ही दोघी बहिणी. ललितानेही नाटकातून काम केले. तिचे पती दामू केंकरे हे नाटय़व्यावसायिक. ललिता व दामू यांचा मुलगा आणि माझा भाचा विजय व त्याची पत्नी मंगला हेही याच व्यवसायात आहेत. आमचे घराणे हे कलाकारांचे घराणे असल्याचे त्या अभिमानाने सांगतात. वडील साहित्य संघाशी निगडित असल्याने सुरुवातीच्या काळात साहित्य संघाच्या नाटकांमधून त्यांनी छोटय़ा मोठय़ा भूमिका केल्या. अनेक दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. याचा फायदा त्यांना पुढे झाला. माझे दिगंवत पती सुधाकर करमरकर यांचा सक्रिय पाठिंबा आणि प्रोत्साहन असल्यानेच आपण बालरंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीवर काम करू शकलो. त्यांची मोलाची साथ मला मिळाली, असे सुधाताई आवर्जून सांगतात.
बालरंगभूमी ही व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट किंवा मालिकांमधून भविष्यातील चांगले कलाकार घडवणारी शाळा आहे. त्यामुळे बालरंगभूमी, बालनाटय़े यांना कमी लेखता येणार नाही. बालरंगभूमीच्या प्रश्नांकडे सर्वच नाटय़ व्यावसायिक आणि शासनाने विशेष गंभीरपणे पाहिले पहिजे. बालनाटय़े म्हणजे फक्त करमणूक नव्हे तर बाल किंवा किशोरवयीन मुलांचे भावविश्व, त्यांचे प्रश्न याचे प्रतिबिंब या बालनाटय़ातून उमटले पाहिजे, असे त्या आवर्जून सांगतात.
सुधाताई यांनी लिटिल थिएटरतर्फे मोठय़ा प्रमाणात बालनाटय़ व प्रौढ नाटय़ प्रशिक्षण शिबिरेही आयोजित केली. या शिबिरांमधून अनेकांनी सुधाताई यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरविले. अशा प्रशिक्षण शिबिरातून मुलांमधील सुप्त अभिनय कलागुणांना योग्य वळण मिळते. मार्गदर्शन आणि प्रशिक्षणामुळे त्यांच्यातील कलाकार घडतो, विकसित होतो असा विश्वास त्यांना वाटतो.
बाल रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन राज्य शासनाच्या ‘प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव’ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. ‘झी मराठी’नेही त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला. आयुष्याच्या या टप्प्यावर पती सुधाकर यांचे निधन आणि चैतन्य व गौतम या दोन मुलांच्या अकाली निधनाचा आघातही त्यांनी पचवला आहे. त्यांचा मोठा मुलगा डॉ. मिलिंद हाच आता त्यांचा आधार आहे.
बालरंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमीवर एक काळ गाजवलेल्या, पल्लेदार संवाद, अभिनय, कामाच्या झपाटय़ाने बालरंगभूमी व मराठी नाटय़ व्यवसायात आपले स्वतंत्र अस्तित्व आणि दबदबा निर्माण करणाऱ्या त्या सुधाताई वयोपरत्वे आलेले परावलंबित्व, शारीरिक आजार, हिंडण्या-फिरण्यावर आलेली मर्यादा यामुळे आज हरवल्या आहेत. आता वेळ कसा घालवता? या प्रश्नावर त्या, तो कसा घालवायचा हाच खरा मोठा प्रश्न असल्याचे पटकन बोलूनही जातात. वृत्तपत्र वाचन आणि ‘झी मराठी’वरील मालिका पाहणे हा त्यांचा आता विरंगुळा आहे.
वयोपरत्वे विस्मरण होत असले तरी पाश्र्वनाथ आळतेकर यांनी नाटय़शिबिरात शिकवलेले ‘कलाकाराच्या अंत:करणाच्या सखोल गर्तेतून निर्माण होणाऱ्या भावनांच्या उत्तुंग लहरींच्या खळबळाटानं होणाऱ्या प्रयत्नांची वाटचाल..’ हे पल्लेदार वाक्यही त्यांनी गप्पांचा समारोप करताना जसेच्या तसे म्हणून दाखविले. शरीर थकले असले तरी आजही रंगभूमी हाच आपला श्वास आणि ध्यास आहे, हे त्यांनी नकळत कृतीतून सांगून टाकले..

Jaya Bachchan Birth Day
Jaya Bachchan: रेखा नावाचं वादळ, राज ठाकरे नावाचा झंझावात परतवणारी चतुरस्र नायिका
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट