‘आयुष्यात कोणतीच गोष्ट सहज मिळत नसते. अगदी मलाही कोणतीच गोष्ट सहज मिळाली नव्हती. सुरूवातीला मीही खूप खस्ता खाल्ल्या मगच माझ्या वाट्याला हे यश आलं’.. व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आल्यानंतर विजू मामांची ही पहिली प्रतिक्रिया होती. ‘मोरूची मावशी’ हे नाटक आपल्या अभिनय कौशल्यानं खऱ्या अर्थानं त्यांनी अजराअमर केलं.

हा पुरस्कार मिळाल्यानंतर त्याकाळच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिली. ‘मोरूची मावशी’, ‘श्रीमंत दामोदर पंत’ यांसारख्या नाटकांमुळे यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या विजू मामांनी सुरूवातीच्या काळातील एका आठवणीला उजाळा दिला. उमेदीच्या काळात अभिनयाचे धडे गिरवताचा अंधुकसा लक्षात राहिलेला हा किस्सा ते अनेकदा सांगतात.

‘छबिलदासमध्ये सुरूवातीच्या काळात आम्ही एकांकिका करायचो. त्यावेळी छबिलदासच्या गल्लीत मिळणारे बटाटेवडे खूपच प्रसिद्ध होते. भूक लागली की ते खाण्याचा मोह अनेकदा व्हायचा. पण खिशात तेव्हा पैसे नसायचे. मग नाटकाच्या सरावासाठी येणाऱ्या इतर मंडळींच्या खिशात जितके पैसे असतील ते एकत्र करून वडे घ्यायचो. दहा पैसे, चार आणे असे खिशात असतील तेवढे पैसे एकत्र करून आम्ही वडा खाऊन पोट भरायचो. पण पोटाला चिमटा काढून जीव ओतून साकारलेल्या त्या कामातही वेगळीच मज्जा होती असंही ते म्हणाले.

‘अभिनयाची आवड नसताना बदली कलाकार म्हणून महाविद्यालयात एका नाटकात काम केले. तिथे पहिला हशा, टाळ्या घेतल्या आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारही मिळविला. तिथून माझा अभिनय प्रवास सुरु झाला आणि आजही तो संपलेला नाही, असे विजय चव्हाण यांनी व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्या नंतर आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले होते’

नाटकातून आपल्या अभिनयाच पाय पक्का केलेल्या विजू मामांनी १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वहिनीची माया’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ‘झपाटलेला’, ‘पछाडलेला’, ‘भरत आला परत’, ‘जत्रा’, ‘घोळात घोळ’, ‘आली लहर केला कहर’, ‘माहेरची साडी’, ‘येऊ का घरात’ यांसारख्या अनेक चित्रपटांत त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. ‘हलाल’ हा अलिकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट बहुदा त्यांचा शेवटचा चित्रपट असावा. यात त्यांनी मुस्लिम व्यक्तिरेखा साकारली होती.