ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय चव्हाण यांचं वयाच्या ६३ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. प्रकृती अस्वास्थ्यामुळे रंगभूमीपासून दुरावलेल्या विजू मामांची पुन्हा एकदा रंगभूमीवर काम करण्याची इच्छा होती. मात्र त्याआधीही आपला लाडका मुलगा वरद याचं लग्न त्यांना पाहायचं होतं. बोहल्यावर चढलेल्या वरदला सुखी संसारासाठी भरभरून आशीर्वाद त्यांना द्यायचे होते. मात्र त्यांची ही इच्छादेखील आता अपूर्णच राहिली आहे.
वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयाच्या क्षेत्रात आलेल्या वरदचं डिसेंबरमध्ये लग्न आहे. वरदनं अनेक मालिकांमधून काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. माझं लग्न पाहण्याची त्यांची शेवटची इच्छा होती असं वरदनं ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना सांगितले.
विजय चव्हाण आणि छबिलदासचा वडा, हा किस्सा तुम्हाला माहितीये का?
‘बाबांना माझं लग्न पाहण्याची खूप इच्छा होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती स्थिर नव्हती. आठवड्याभरात त्यांची प्रकृती खूपच खालावली. माझं लग्न पाहायला मिळणार नाही अशी खंतही त्यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. हे सगळं खूपच अस्वस्थ करणारं होतं. त्यांच्याकडे आता फार कमी दिवस उरले आहेत हे त्यांना कळलं होतं, म्हणूनच माझं लग्न डिसेंबरमध्ये असलं तरी ते आता झालंय अशी स्वत:ची समजूत काढून त्यांनी सर्वांचा निरोप घेतला’ अशी भावना वरदनं व्यक्त केली.
…म्हणून विजू मामा कधीच मोबाईल वापरत नव्हते!
विजय चव्हाण यांनी मुंबईतल्या मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात शुक्रवारी पहाटे अखेरचा श्वास घेतला. ‘मोरूची मावशी’ हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेलं नाटक ठरलं. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वहिनीची माया’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. अभिनयाची आवड नसताना बदली कलाकार म्हणून महाविद्यालयात एका नाटकात काम केले. या नाटकावेळी त्यांनी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट मिळवला होता. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधीही पाहिले नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 24, 2018 12:23 pm