करोना विषाणूमुळे संपूर्ण जगात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. २०० पेक्षा अधिक देशांमध्ये पसरलेल्या या विषाणूमुळे अगदी सेलिब्रिटींनी देखील प्राण गमावले आहेत. या यादीत आता आणखी एका सेलिब्रिटीचं नाव जोडलं गेलं आहे. प्रसिद्ध बंगाली कवी, गीतकार प्रदीप घोष यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ७८ वर्षांचे होते. कोलकातामध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

प्रदीप घोष एक उत्तम कवी आणि गीतकार होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नाटकांच्या संहिता देखील लिहिल्या आहेत. रंगभूमी व्यतिरिक्त ते शिक्षण क्षेत्रातही कार्यरत होते. त्यांचे विद्यार्थी त्यांना लाडाने ‘पा’ म्हणून हाक मारायचे. प्रदीप घोष यांच्या निधनामुळे साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली.

भारतात गेल्या २४ तासात ६३ हजार ३७१ नवे करोना रुग्ण आढळले असून ८९५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत भारतातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या ७३ लाख ७० हजार ४६९ वर पोहोचली आहे. देशात सध्या ८ लाख ४ हजार ५२८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ६४ लाख ५३ हजार ७८० रुग्णांना उपचारानंतर बरे झाले असून घरी सोडण्यात आलं आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.

करोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण गुरुवारी ८७.३५ टक्के झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं होतं. गुरुवारी २४ तासांत ६८० जण मृत्युमुखी पडल्याने करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या १ लाख ११ हजार २६६ झाला होती. मृत्युमुखी पडलेल्यांची आकडेवारी घटून १.५२ टक्क्य़ांवर आली आहे. देशीतल करोनाबाधितांची संख्या एकूण रुग्णांच्या ११.११ टक्के आहे.