भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री जयंती यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. 26 जुलैला जयंती यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ७६ वर्षांच्या होत्या. जयंती यांनी विविध भाषांमधील सिनेमांमध्ये काम केलं होतं. मात्र खास करून कन्नड सिनेमासाठी त्यांचं मोलाचं योगदान लाभलं होतं. कन्नड सिनेमातील यशस्वी अभित्रींपैकी त्या एक होत्या.

जयंती यांचा मुलगा कृष्णा कुमार यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली. बंगळूरु टाइम्सच्या वृत्तानुसार जयंती या गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याचं त्यांच्या मुलाने सांगितलं आहे.

जयंती यांनी कन्नड, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि हिंदी सिनेमांमध्ये देखील काम केलंय. जयंती यांना त्यांच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी देखील एक ट्विट करत जयंती यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय.

जयंती यांना सातवेळा कर्नाटक राज्य फिल्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. तर दोन वेळा फिल्म फेअर पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. जयंती यांनी त्यांच्या कारकिर्दित अनेक बड्या कलाकारांसोबत स्क्रीन शेअर केलीय. जयंती यांच्या निधनामिळे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून शोक व्यक्त केला जातोय.