मंगळवारी प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री जयंती यांच्या निधनाची बातमी समोर आली होती. अनेक वृत्तपत्रांनी आणि वृत्त वाहिन्यांनी त्यांच्या निधनाची बातमी छापली होती. पण नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्री जयंती यांचे कर्नाटक येथील एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जयंती यांना श्वसनाचा त्रास होत होता. यावर उपचार करण्यासाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते.

यादरम्यानच त्यांचे निधन झाले असे वृत्त अनेक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले होते. पण त्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया या वेबसाइटने हे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आणि सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे स्पष्ट केले. वृत्त संस्था एएनआयने त्यांच्या ट्विटमध्ये जयंती यांचे निधन झाल्याचे म्हटले होते. त्यांच्या या ट्विटवरुन अनेक वेबसाइट आणि वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या निधनाची बातमी प्रसिद्ध केली होती. पण त्यानंतर मात्र चुकीची बातमी छापल्याबद्दल अनेक वेबसाइटने माफीही मागितली.

जयंतीने आपल्या करिअरची सुरूवात बालकलाकार म्हणून केलेली. त्या एक अभिनेत्री तर आहेतच, शिवाय त्यांचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊसही आहे. त्यांनी अनेक गाणीही गायली आहेत. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील यशस्वी अभिनेत्रींमध्ये जयंती यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. जयंती यांनी ६० च्या दशकात बॉलिवूडमधील अनेक सिनेमांत काम केले आहे. ‘बहुरानियां’, ‘तुमसे अच्छा कौन है’ आणि ‘गुंडा’ या सिनेमात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. कन्नड भाषेतील सुमारे ५०० हून जास्त सिनेमांत त्यांनी काम केले आहे. कन्नडड सिनेसृष्टीने त्यांना ‘शारदे’ ही उपाधीही बहाल केली आहे.