विनोद निर्मितीसाठी किंवा प्रेक्षकांना हसविण्याकरिता वेडेवाकडे अंगविक्षेप, कमरेखालील विनोद करावे लागतात, पुरुष अभिनेत्याला ‘बाई’च्या वेषात वावरावे लागते, असा काही जणांचा समज असून तोच खरा आहे, असा अविर्भाव हल्ली असतो. पण प्रेक्षकांना निखळ हसविण्यासाठी याची अजिबात गरज नसते तर तुमच्या देहबोलीतून, एखाद्या सहज बोललेल्या वाक्यातून, टाकलेल्या निव्वळ कटाक्षातून किंवा चेहऱ्यावरील ‘भावा’तून प्रेक्षकांना हसविता येते, हे ज्यांनी आपल्या सशक्त अभिनयाने सिद्ध केले आणि आजही ‘एन्ट्री’झाली की प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर उत्स्फूर्त हसू फुलविण्याची ज्यांची ताकद आहे ते आहेत ज्येष्ठ अभिनेते आहेत किशोर प्रधान. आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी.

विनोदी आणि फार्स प्रकारातील नाटकांमधून काम करताना त्यांनी प्रेक्षकांना मनमुराद हसविले. भूमिका मग ती मोठी असो किंवा छोटी. त्याच्या लांबी-रुंदीचा विचार न करता जीव ओतून ती भूमिका त्यांनी साकारली. मराठी व्यावसायिक रंगभूमी, इंग्रजी रंगभूमी, चित्रपट, दूरदर्शन आणि जाहिरातींमधून प्रेक्षकांनी त्यांना पाहिले आहे. आजवरच्या अभिनय प्रवासात त्यांनी विविध भूमिका केल्या असल्या तरी त्यांच्यावर ‘विनोदी’ अभिनेता असाच शिक्का बसला आहे. आयुष्याच्या या टप्प्यावर त्याची खंत वाटते का? या प्रश्नावर किशोर प्रधान म्हणाले, याची अजिबात खंत वाटत नाही उलट मी विनोदी अभिनेता म्हणून ओळखला जातो याचा मला अभिमान आहे. विनोदी नाटक आणि फार्स यातील सीमारेषा अत्यंत धुसर आहे. ती सांभाळायचे मोठे आव्हान विनोदी अभिनेत्यापुढे असते. मी ते कसोशीने सांभाळले. आज कुठेही गेलो तरी ओळखीचे, अनोळखी लोक भेटतात आणि ‘तुम्ही आम्हाला भरभरून आनंद दिला व खळखळून हसविले’ असे सांगतात. माझ्यासाठी तोच जीवनातील सगळयात मोठा आनंद, समाधान आणि अमूल्य ठेवा आहे. विनोदी अभिनेता म्हणून स्वत:ला घडविताना डोळ्यासमोर कोणाचा आदर्श होता? यावर त्यांनी सांगितले, मी आजवर कोणाचीही नक्कल केली नाही. पण आत्माराम भेंडे हे एक उत्कृष्ट विनोदी अभिनेते होते. त्यांच्याबरोबर अनेक नाटकांमधून काम केले. त्यामुळे त्यांच्या अभिनयाचा संस्कार कळत-नकळत माझ्यावर झाला.

Sunetra Pawar gave a loan of 50 lakhs to Pratibha Pawar and 35 lakhs to Supriya Sule
सुनेत्रा पवारांनी प्रतिभा पवारांना ५० लाख तर, सुप्रिया सुळे यांना दिले ३५ लाखांचे कर्ज
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

आज विनोदाची व्याख्या बदलली असून आचरटपणा म्हणजेच विनोद असे काही जणांना वाटते. प्रत्यक्षात तसे नाही पण आजकाल सगळीकडे तेच सुरू असल्याने ते मनाला पटत नाही. त्यामुळे सध्याचे कथित विनोदी कार्यक्रम, मालिका, नाटके मी पाहात नाही, असेही प्रधान यांनी परखडपणे सांगितले.

किशोर प्रधान हे मूळचे नागपूरचे. त्यांचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण नागपूरलाच झाले. नागपूरच्या ‘मॉरिस’ महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळविली. पुढे ‘अर्थशास्त्र’विषय घेऊन त्यांनी ‘एम.ए.’ केले. महाविद्यालयीन स्तरावर विविध स्पर्धामधून त्यांनी अनेक एकांकिका, नाटकांमधून काम केले. पुरुषोत्तम दारव्हेकर यांच्या ‘रंजन कला मंदिर’साठीही प्रधान यांनी अनेक बालनाटय़े, नाटके केली. त्यांची आई मालतीबाई प्रधान या नाटकवेडय़ा होत्या. त्या काळात म्हणजे १९४२/४५ च्या सुमारास त्या नाटकातून काम करायच्या, नाटक बसवायच्या. विदर्भ साहित्य संघासाठी त्यांनी ‘एकच प्याला’ बसविले होते. घरी नाटकाच्या तालमी चालायच्या. प्रधान यांचे वडील अमृतराव प्रधान (त्या वेळच्या अमृत फार्मसीचे मालक) यांचाही पूर्ण पाठिंबा व प्रोत्साहन पत्नीला होते. घरातच नाटक असल्याने ते संस्कार लहानपणापासूनच त्यांच्यावर झाले. मुंबईच्या टाटा सामाजिक संस्थेची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आणि १९६० मध्ये ते मुंबईला आले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिन्याभराच्या आत त्यांना ‘ग्लॅक्सो’कंपनीत ‘वर्क्‍स रिसर्च असिस्टंट’ म्हणून नोकरी मिळाली.

‘ग्लॅक्सो’मध्ये २८ वर्षांच्या दीर्घ सेवेनंतर १९९४ मध्ये ते ‘ऑर्गनायझेशन अ‍ॅण्ड मेथड’ विभागाचे ‘अखिल भारतीय व्यवस्थापक’ या पदावरून निवृत्त झाले. नोकरी सांभाळूनच सर्व नाटके, तालमी, दौरे त्यांनी केले.

सुरुवातीच्या काळातील नाटय़प्रवासाच्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले, नागपुरात असताना खूप नाटके केली. मुंबईला आल्यानंतर यात खंड पडला होता. काहीतरी करावे या उद्देशाने वांद्रे येथील ‘एमआयजी’ वसाहतीत मी नाटय़वेडय़ांना एकत्र केले आणि ‘नटराज’ही संस्था सुरू केली. शाम फडके लिखित ‘तीन चोक तेरा’ हे नाटक आम्ही करायचे ठरविले. नाटकाचे       दिग्दर्शन माझेच होते. नाटक बसविण्याची माझी पद्धत, अभिनय व नाटकातील कलाकाराचा संच हे फडके यांना आवडले. त्यांनी त्यांचे ‘काका किशाचा’हे नवे नाटक आम्हाला दिले. या नाटकाने इतिहास घडविला. त्या काळातील अनेक  स्पर्धामधून या नाटकाला अभिनय, दिग्दर्शनासाठी पारितोषिके मिळाली. नाटकाच्या प्रसिद्धीमुळे यशवंत पगार हे नाटय़निर्माते आमच्याकडे आले आणि त्यांनी हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर सादर करण्याविषयी निमंत्रण दिले. आमच्या सगळ्यांसाठी ती विशेष बाब होती.  एका प्रयोगाचे सहाशे रुपये मानधन नक्की झाले आणि पगार यांनी पहिल्या पाच प्रयोगांची आगाऊ रक्कम आम्हाला दिली. महाराष्ट्राच्या विविध भागात नाटकाचे २०० प्रयोग केले. प्रत्येक प्रयोग ‘हाऊसफुल्ल’ असायचा. ‘काका किशाचा’या नाटकामुळे मला व्यावसायिक रंगभूमीवर नाटकातून काम करण्यासाठी तसेच नाटक बसविण्यासाठी बोलावणी येऊ लागली. ‘ग्लॅक्सो’तील नोकरी सांभाळून मी ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हनिमून झालाच पाहिजे’, ‘हॅड्स अप’, ‘संभव असंभव’ आदी नाटके केली. बबन प्रभू, आत्माराम भेंडे यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबतही काम करण्याची संधी मिळाली. याच कालावधीत मराठी चित्रपटाच्याही ‘ऑफर्स’ येत होत्या. पण तेव्हा मराठी चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापूर, पुण्याला व्हायचे. तसेच ते सलग काही दिवस असल्याने नोकरीतून रजा घेऊन जाणे शक्य नसल्याने तेव्हा चित्रपट नाकारले. पण निवृत्तीनंतर मात्र काही चित्रपट केले. ‘मामा भाचे’हा माझा पहिला मराठी चित्रपट. पुढे ‘डॉक्टर डॉक्टर’,‘भिंगरी’, ‘नवरा माझा ब्रह्मचारी’, ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘लालबाग परळ’ या चित्रपटातून काम केले.

‘लगे रहो मुन्नाभाई’ मधील ‘खटय़ाळ म्हातारा’ त्यांनी रंगविला. भूमिका छोटीशीच असली तरी ते आपली छाप पाडून गेले. ‘जब वुई मेट’मधील त्यांच्या ‘स्टेशन मास्तर’ही प्रेक्षकांच्या लक्षात राहिला. पण हिंदी चित्रपट आणि तेथील वातावरणात ते फारसे रमले नाहीत. मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाल्यानंतर दूरदर्शनवरून ‘निरोप’ हे पहिले मराठी नाटक सादर झाले त्यात त्यांची भूमिका होती. पुढे दूरदर्शनच्या अनेक नाटकांमधून त्यांनी भूमिका केल्या. याकुब सईद यांच्यासमवेत सादर झालेल्या ‘हास परिहास’कार्यक्रम ते होते. दूरदर्शनवरील लोकप्रिय ‘गजरा’हा कार्यक्रम त्यांनी त्यांची अभिनेत्री पत्नी शोभासह सादर केला.

किशोर प्रधान यांनी दिग्दर्शित केलेले पहिले नाटक ‘तीन चोक तेरा’होते. त्या विषयी आठवणी जागविताना ते म्हणाले, ‘तीन चोक तेरा’ हे नाटक बसविताना आम्हाला नायिका मिळत नव्हती. ‘एमआयजी’ कॉलनीतील एक मुलगी दररोज संध्याकाळी बसथांब्यावर बसची वाट पाहात उभी असते. एका गुजराथी नाटकाच्या तालमीसाठी ती दररोज जाते, अशी माहिती मला माझ्या खबऱ्यांकडून मिळाली होती. बसथांब्यावर त्या मुलीला पाहिले आणि आपल्या नाटकासाठी तीच नायिका म्हणून योग्य असल्याचे जाहीर केले. आता प्रश्न तिच्या घरच्यांची परवानगी मिळविण्याचा होता. मी तिच्या घरी गेलो. त्या काळातील प्रसिद्ध साहित्यिक आणि स्वातंत्र्यसैनिक व्यंकटेश वकील हे त्या मुलीचे वडील. त्यांच्याशी बोलून नाटकात काम करण्यासाठी परवानगी मिळाली. नाटक व्यवस्थित पार पडले आणि पुढे त्या काळात जगातील ८० टक्के दिग्दर्शकांच्या बाबतीत जे घडते ते माझ्याही बाबतीत घडले. आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो व आमचा प्रेमविवाह झाला.

प्रधान यांच्या अभिनय प्रवासात इंग्रजी नाटकांनाही महत्त्वाचे स्थान आहे. भरत दाभोळकर यांचे ‘बॉटमअप्स’हे त्यांचे पहिले इंग्रजी नाटक. आत्माराम भेंडे यांच्यामुळे त्यांना ते मिळाले. त्यानंतर त्यांनी भरत दाभोळकर यांच्या १८ इंग्रजी नाटकांतून त्यांनी काम केले. येत्या १ नोव्हेंबर रोजी किशोर प्रधान ८० व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. आता सध्या सकाळी बाहेर पडून घरची काही कामे, संध्याकाळी थोडा वेळ बाहेर फिरायला जाणे, वृत्तपत्र वाचन, वृत्तवाहिन्या व उत्तम नाटके आणि चित्रपट पाहणे हा त्यांचा विरंगुळा आहे. चित्रपट किंवा मालिकांमधून चांगली भूमिका मिळाली तर करायची आजही त्यांची तयारी आहे. एका ‘हेअर डाय’ कंपनीच्या जाहिरातीत त्यांनी काम केले असून ती जाहिरात लवकरच दूरचित्रवाहिन्यांवर झळकणार आहे तर कपडे धुण्याच्या साबणाच्या एका जाहिरातीचे चित्रीकरण त्यांनी नुकतेच पूर्ण केले आहे. ‘फॅमिली कट्टा’, ‘स्टेपनी’ हे त्यांचे आगामी मराठी चित्रपट. आजवर पैसा, प्रसिद्धी खूप मिळाली. आता पैशासाठी नाही, पण हौस म्हणून आणि मनाला आनंद वाटेल यासाठी जमेल आणि झेपेल तसे काम ते आजही करतात.

प्रधान यांच्या आजवरच्या अभिनय प्रवासातील बहुतांश नाटके ही विनोदी आणि फार्स या प्रकारातील. त्यामुळे गप्पांचा समारोप साहजिकच विनोदी नाटक आणि फार्स यातील नेमका फरक काय या प्रश्नाने झाला. ते म्हणाले, विनोदी नाटकातील प्रसंग रोजच्या जीवनात घडणारे असतात तर फार्समध्ये हेच प्रसंग ओढूनताणून विनोदनिर्मिती केली जाते. घरी आरशात तुमचा चेहरा तुम्ही जसे आहात तसाच दिसतो पण जत्रेतील आरशात तुम्हाला तुमचा चेहरा वेगवेगळ्या विनोदी रूपात पाहायला मिळतो. माणूस तोच पण चेहरा मात्र वेगळा. विनोदी नाटक व फार्स यातही तसाच प्रकार आहे. विनोदी अभिनेत्याला प्रेक्षकांना हसवायचे असते. प्रत्येक ठिकाणचा प्रेक्षक व त्याची पातळी ही वेगवेगळी असते. विनोद समजणे, त्याला दाद देणे हेही व्यक्तिसापेक्ष असते. त्यामुळे प्रत्येक ठिकाणच्या प्रेक्षकाची नस ओळखून त्याला हसायला लावणे हे मोठे आव्हान विनोदी अभिनेत्यासमोर असते. हे आव्हान जो लीलया पेलतो आणि प्रेक्षकांना निखळ हसवितो, आनंद देतो तो खरा विनोद आणि तोच खरा विनोदी अभिनेता..