शाळा-महाविद्यालयात असताना काही अपवाद वगळले तर स्नेहसंमेलन किंवा एकांकिका स्पर्धामधून विशेष असा सहभाग नाही, महाविद्यालयीन शिक्षण घेण्याच्या वयापर्यंत गाण्याचेही शिक्षण नाही, घरात कोणीही अभिनय क्षेत्रातील नाही उलट घरातील सर्वजण क्रीडाप्रेमी, काही वर्षे मुंबई उच्च न्यायालयात ‘लिपिक’ म्हणून नोकरी मात्र असे सगळे असूनही जणू काही नियतीने त्यांच्या ललाटी गायक-अभिनेता होण्याचेच लिहिलेले होते. गायन किंवा अभिनयाची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना ज्यांनी मेहनत व अभ्यासाने मराठी संगीत रंगभूमीवर आपल्या नावाचा स्वतंत्र ठसा उमटविला ते कलाकार आहेत ज्येष्ठ गायक-अभिनेते अरविंद पिळगावकर..

मुंबई मराठी साहित्य संघाने सादर केलेल्या ‘यशवंतराव होळकर’ या ऐतिहासिक नाटकाच्या माध्यमातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले आणि नंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. त्यानंतर ‘ललितकलादर्श’, ‘कलावैभव’, ‘नाटयमंदार’, ‘रंगशारदा’ आणि ‘चंद्रलेखा’ आदी नाटय़संस्थांच्या अनेक नाटकांमधून विविध भूमिका त्यांनी साकारल्या. आकाशवाणी-दूरदर्शनसाठीही काम केले.

Loksatta kalakaran Architecture heritage and reality
कलाकारण: वास्तुरचना, वारसा आणि वास्तव!
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
laxmikant berde son abhinay berde
लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण! पहिल्या नाटकाबद्दल अभिनय म्हणाला, “आज आईबाबांच्या आशीर्वादाने…”
kiran mane reacted on rohit pawar ED inquiry
“ईडी, सीबीआय नाहीतर रंगाबिल्ला येऊद्या, पण…”, मराठी अभिनेत्याची रोहित पवारांबद्दल पोस्ट; म्हणाले, “आयुष्यात…”

आपले घराणे आणि जडणघडणीविषयी बोलताना ते म्हणाले, आम्ही मूळचे गोव्याचे. माझे पणजोबा रामचंद्र पिळगावकर सुमारे सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वी मुंबईत आले. आमचे मूळ आडनाव राजाध्यक्ष. पण माझे पणजोबा ‘पिळगावकर’ यांच्याकडे दत्तक गेल्याने आम्ही राजाध्यक्षचे पिळगावकर झालो. माझे वडील गडबडनाथ पिळगावकर हे मुंबईतच सरकारच्या महसूल खात्यात नोकरीला होते. मला गाण्याचा वारसा माझी आई मोतीबाई हिच्याकडून मिळाला. तिला गाण्याची आवड होती. माझे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अनुक्रमे चिखलवाडी प्राथमिक शाळा व गोखले एज्युकेशन सोसायटीच्या ‘धरमसी गोविंदजी ठाकरसी’ शाळेत झाले. पुढे विल्सन महाविद्यालयातून मी इतिहास व अर्थशास्त्र विषय घेऊन ‘बी.ए.’ झालो. महाविद्यालयात असताना नाटक किंवा एकांकिका स्पर्धेतून मी सहभागी झालो नव्हतो. ललिता केंकरे व ज्येष्ठ संगीत समीक्षक दिवंगत डॉ. अशोक रानडे माझ्या वर्गात होते. अभिनेत्री शुभा खोटे माझ्या एक वर्ष पुढे होती. ‘बी.ए’ला असताना रमेश खेर यांनी लिहिलेल्या ‘मदन दहनम्’ या संस्कृत नाटिकेत मी ‘मदन’ तर डॉ. अशोक रानडे याने ‘शंकर’ ही भूमिका केली. या नाटिकेचे दिग्दर्शन दाजी भाटवडेकर यांनी केले होते. मला गाण्याची आवड होती. अधूनमधून मी गाणी म्हणत असे. त्या वेळी अशोक रानडे याने गाणे शिकलायस का?, म्हणून विचारले त्यावर मी नाही म्हटल्यावर त्याने मला गाण्याचे शिक्षण घे, असे सांगितले. त्याच्या सांगण्यावरून ‘इंटरमिजिएट’ नंतर मी पं. के. डी. जावकर यांच्याकडे गाण्याचे प्राथमिक धडे गिरविले. जावकर यांच्याकडे अभिनेते जयंत सावरकर व शशी पेंडसे हेही गाणे शिकायला येत होते. जयंत सावरकर यांच्याच ओळखीने मी तेव्हा सई परांजपे यांनी लिहिलेल्या व सुधा करमरकर यांच्या ‘लिटिल थिएटर’ने सादर केलेल्या ‘शेपटीचा शाप’ या नाटकात कवी रंगविला होता. ‘बीए’ झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात ‘लिपिक’ म्हणून नोकरीही केली. हे सगळे करत असताना गाणे किंवा नाटक ‘व्यवसाय’ म्हणून स्वीकारावा असे मनातही नव्हते. पण योगायोगाने पुढे तसेच घडले. काही वर्षांनंतर मी नोकरीचा राजीनामाही दिला आणि पूर्णवेळ गायन व अभिनय याकडेच वळलो.

ravi08
‘नयन तुझे जादुगार’ नाटकात भारती मालवणकर-मंगेशकर, अरविंद पिळगावकर, कुमुद कामेरकर

त्यानंतर झालेल्या अभिनय प्रवासाविषयीच्या आठवणींचा पट उलगडताना त्यांनी सांगितले, मीना पेठे यांनी ‘वासवदत्ता’ हे नाटक सादर केले होते. नाटकातील नायकाच्या भूमिकेसाठी ‘देखणा, साडेपाच फूट उंची असलेला’ अभिनेता हवा आहे, अशी जाहिरात त्यांनी दिली होती. पेठे या जयंत सावरकर यांची मैत्रीण. सावरकर यांनी मला तिकडे जायला सांगितले. ऑडिशन होऊन माझी निवड झाली. या नाटकात सुहासिनी मूळगावकर व ललिता केंकरे या दोघी माझ्या नायिका होत्या. त्यानंतर पुढे अनेक नाटकांमधून मी काम केले. यात ‘नयन तुझे जादुगार’, ‘घन:श्याम नयनी आला’, ‘जय जगदीश हरे’, ‘धाडिला राम तिने का वनी’ तसेच ‘संगीत सौभद्र’, ‘संगीत मृच्छकटिक’, ‘संगीत संशयकल्लोळ’, ‘संगीत शारदा’, ‘संगीत मानापमान’, ‘संगीत भावबंधन’, ‘संगीत स्वयंवर’, ‘संगीत पुण्यप्रभाव’, ‘संगीत एकच प्याला’ आदी संगीत नाटके, ‘संत कान्होपात्रा’, ‘संत नामदेव’, ‘भाव तोची देव’ आणि ‘आतून कीर्तन वरून तमाशा’, ‘विठो रखुमाय’, ‘दशावतारी राजा’ या लोकनाटय़ांचा समावेश आहे. १९७२ मध्ये ‘चंद्रलेखा’ने सादर केलेल्या आणि पु. ल. देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकातही ‘देसाई’ ही भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या नाटकात गायक पं. वसंतराव देशपांडे यांनी ‘पुलं’ची भूमिका केली होती. आजवरचा हा सगळा नाटय़प्रवास मला खूप काही शिकवून गेला. त्याने मला समद्ध केले.

कै. मामा वरेरकर स्मारक निधीतर्फे सादर होणाऱ्या मामा वरेरकर स्मृती कार्यक्रमांसाठी त्यांनी काही वर्षे लेखन केले. लेखन, दिग्दर्शन व संकल्पना असलेला ‘नाते राधाकृष्णाचे’, मो. ग. रांगणेकर व मामा वरेरकर यांच्या नाटय़पदांवरील ‘बोला अमृत बोला’ आदी कार्यक्रमही त्यांनी सादर केले. ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री रजनी जोशी यांच्याबरोबर ‘संगीत नाटक मार्गदर्शन’ शिबिरातून नव्या पिढीला मार्गदर्शन केले. गेल्या पन्नास-पंचावन्न वर्षांतील अनुभवांवर आधारित ‘नाटय़ गायन निपुण कला’ हा कार्यक्रम ते सादर करतात. नव्या पिढीत नाटय़संगीताची ओळख व आवड निर्माण करणे आणि जुन्या पिढीतील लोकांचे ‘स्मरणरंजन’ हा उद्देश त्या मागे असल्याचे पिळगावकर सांगतात.

‘नयन तुझे जादुगार’ नाटकातील पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी लिहिलेले आणि पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेले ‘जा उडुनी जा पाखरा नयनमनोहर पाहुनी परिसर भुलू नको रे जरा’ हे पिळगावकर यांनी गायलेले गाणे रसिकांच्या आजही स्मरणात आहे. या गाण्यासह  ‘कधी भेटेन वनवासी वियोगी रामचंद्राला’, ‘तुझा गे नीतनूतन सहवास तुझेच चिंतन करितो अनुदिन’, ‘तू येता सखी माझ्या सदनी जीवन सुफलित झाले’, ‘दशदिशास पुसतो, पुसतो वेडय़ा नभा ती कुठे राजसा माझी प्रियवल्लभा’, ‘मंद मंद ये समीर जागवित आठवणी विकसित मधू गंध बहर स्वर्गसुखाच्या लहरी’, ‘रूपसुंदर सखी साजिरी’ ही गाणीही त्यांनी गायली आहेत. संगीत रंगभूमीवर आपल्या गाण्याचा ठसा उमटविणाऱ्या पिळगावकर यांनी चित्रपटांसाठी फारसे पाश्र्वगायन केलेले नाही. ‘मुक्काम पोस्ट ढेबेवाडी’ या एकाच चित्रपटासाठी त्यांनी एक गण गायला. ‘गणराज गजानन गौरीसुता, धनी तुच आमचा बोलविता’ असे शब्द असलेला हा गण ग. दि. माडगूळकर यांनी लिहिला होता तर याचे संगीत राम कदम यांचे होते.

रंगभूमीवरील ‘सुवर्णकाळ’ मानली जाणारी संगीत रंगभूमी काही अपवाद वगळता आज पाहायला मिळत नसल्याबद्दल ते खंत व्यक्त करतात. संगीत नाटकांमधून काम करण्यासाठी तरुण अभिनेते-गायक मिळत नाहीत. गाणे शिकलेली तरुण पिढी याकडे ‘करिअर’ म्हणून पाहात नाही व संगीत रंगभूमीकडेही वळत नाही. संगीत नाटकाला ‘ग्लॅमर’ नाहीच आणि आजच्या तरुण पिढीकडे संगीत रंगभूमीखेरीज इतर अनेक पर्याय असल्याचे निरीक्षणही ते नोंदवितात.

येत्या १८ ऑक्टोबर रोजी पिळगावकर ८० व्या वर्षांत पदार्पण करणार आहेत. या वयातही ते तेवढय़ाच उत्साहाने आणि आपुलकीने संगीत रंगभूमीसाठी त्यांचे योगदान देत असतात. ‘मुंबई मराठी साहित्य संघा’तर्फे ‘धाडिला राम तिने का वनी’, ‘हाच मुलाचा बाप’, ‘संगीत सौभद्र’ ही नाटके नव्याने रंगभूमीवर सादर करण्यात आली. ती नाटके तरुण पिढीकडून बसवून घेण्याचे व  त्यांना मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनीच केले होते. शुभदा दादरकर व श्रीकांत दादरकर यांच्या ‘विद्याधर गोखले संगीत नाटय़ प्रतिष्ठान’तर्फे चालविण्यात येणाऱ्या नाटय़संगीताच्या पदविका वर्गात आजही ते मार्गदर्शन करत आहेत.

पिळगावकर यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या ‘अण्णासाहेब किलरेस्कर जीवनगौरव पुरस्कारा’सह अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. पुतण्या, सून आणि नात यांच्यासह ते आयुष्याची संध्याकाळ सुखात आणि आनंदात व्यतीत करत आहेत. गाण्यातील गुरू पं. जीतेंद्र अभिषेकी, पं. गोविंदराव अग्नी व अभिनयातील गुरू डॉ. दाजी भाटवडेकर यांच्याकडून मिळालेल्या मार्गदर्शनाचा ते कृतज्ञतापर्वक उल्लेख करतात.

आयुष्याच्या या टप्प्यावर जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा इतके काही मिळेल, असे वाटले नव्हते असेही ते प्रांजळपणे सांगून टाकतात.

आजवर मी संगीत नाटकेच केली. त्यामुळे संगीत रंगभूमीचे जतन आणि संवर्धन यासाठी शरीर साथ देईपर्यंत मी काम करत राहणार आहे. संगीत मी कधीही सोडणार नाही. आयुष्यात संगीत नाटक, अभिनय आणि गाण्याने मला आजवर जे काही मिळाले त्यात मी समाधानी, आनंदी आणि कृतार्थ असल्याचे त्यांनी गप्पांचा समारोप करताना सांगितले.