दिग्गज संगीत दिग्दर्शक आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते वनराज भाटिया यांचे आज वृद्धपकाळाने निधन झाले आहे. ९३ वर्षीय वनराज यांनी आज ७ मे रोजी मुंबईत अंतीम श्वास घेतला. वनराज हे दीर्घकाळापासून वार्धक्याशी संबंधीत आराजाशी लढत होते.

३१ मे १९२७ रोजी वनराज भाटिया यांचा जन्म झाला होता. त्यांनी रॉयल अॅकेडमी ऑफ म्युझिकमधून संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर १९५९ मध्ये ते भारतात परतले आणि त्यांनी जाहिरातींसाठी जिंगल बनव्याचे काम सुरु केले. त्यांनी ७००० पेक्षा जास्त जाहिरातींसाठी जिंगल दिले. त्यांच्या निधनाच्या बातमीने बॉलिवूडमध्ये सगळ्यांचा धक्का बसला आहे. बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने ट्वीट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

१९७२ मध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘अंकुर’ या चित्रपटासाठी त्यांनी बॅकग्राउंड संगीत दिले. वनराज यांनी ‘मंथन’, ‘भुमिका’ , ‘जाने भी दो यारो’ सारख्या अनेक चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वसंगीत दिले. ‘अजूबा’ या एकमेव चित्रपटासाठी त्यांनी संगीत दिले होते. १९८८ मध्ये त्यांना ‘तमस’ या चित्रपटासाठी संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर १९८९ मध्ये त्यांना संगीत अकादमीतर्फे गौरविण्यात आले होते. २०१२ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता.