मासिक पाळी, त्या दिवसांमध्ये घ्यायची काळजी या सर्व गोष्टींवर प्रकाशझोत टाकणाऱ्या ‘पॅडमॅन’ची निर्माती ट्विंकल खन्ना हिने एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. केवळ एका ६५ वर्षीय पुरुषाने व्हायग्रा करमुक्त करण्याचे धोरण लागू केल्याने अमेरिकेत त्यावर कर लावला जात नाही असे तिने म्हटले.

ट्विंकल म्हणाली की, सॅनिटरी पॅड आणि टॅम्पन्स या मासिक पाळीतील महत्त्वाच्या वस्तूंवर अमेरिकेत कर लावला जातो. पण व्हायग्रा तेथे करमुक्त आहे. एका ६५ वर्षीय पुरुषाने हे धोरण अंमलात आणल्याने असे केले जाते. तर भारतात सॅनिटरी पॅडवर १२ टक्के कर लावला जातो पण झाडू मात्र करमुक्त आहे. कारण शरीर स्वच्छ ठेवण्यापेक्षा येथे घर स्वच्छ ठेवण्याला अधिक महत्त्व दिले जाते.

वाचा : राज माझा चित्रपट पाहणार नाही, असं होणार नाही- नाना पाटेकर

मासिक पाळीत प्रत्येक महिलेची गरज असलेले सॅनिटरी पॅड करमुक्त करावेत अशी सर्वच महिलांची मागणी आहे. सॅनिटरी पॅडवर कररुपी अधिकभार लावला जात असल्याने काही महिलांना ते विकत घेणे परवडत नाही. तर दुसरीकडे पुरुषांना शारीरिक सुखाचा आनंद अधिक काळ उपभोगता यावा यासाठी घेतले जाणारे व्हायग्रा मात्र करमुक्त आहे. पण, हे काही शारीरिक स्वच्छतेसाठी वापरले जात नाही किंवा प्रत्येक पुरुषाची ही गरजसुद्धा नाही, असेही ती म्हणाली.

अमेरिकेतील अनेक ठिकाणी सॅनिटरी पॅडवर कर लावला जातो पण व्हायग्रावर नाही असे का, असा सवाल ट्विंकलला ‘बीबीसी’च्या ‘व्हिक्टोरिया डर्बीशायर’च्या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, व्हायग्रा करमुक्त करण्याचे धोरण एका ६५ वर्षीय पुरुषाने आणले हे त्यामागचे कारण आहे.

वाचा : अखेर करणी सेना प्रदर्शनापूर्वी पाहणार ‘पद्मावत’

महिला आणि समाजात मासिक पाळीविषयी असलेला न्यूनगंड आणि त्याविषयीच्या गैरसमजुती दूर करण्यासाठीच ‘पॅडमॅन’ चित्रपट साकारण्याची प्रेरणा आपल्याला मिळाल्याचे काही दिवसांपूर्वीच ट्विंकल खन्ना हिने म्हटले होते.